Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 March, 2011

पोलिस निरीक्षक व अधीक्षकांना नोटीस

कावरेपिर्ल केपे खाण प्रकरण

पणजी, दि. ७(प्रतिनिधी) ः
कावरेपिर्ल - केपे येथे बेकायदा खाण चालवणारे शेख सली यांच्या विरोधात केपे पोलिस स्थानकात तक्रार सादर करूनही त्याची नोंद करून न घेतल्याने केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नार्वेकर व दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक एलन डिसा यांना न्यायालयीन नोटीस बजावण्यात आली आहे.
या भागातील नागरिकांनी आंदोलन करून बेकायदा खाण बंद पाडल्यानंतर या खाणीच्या विरोधात आणि खाण संचालकांसह अन्य अधिकार्‍यांविरोधात तक्रार करण्यात आली होती. परंतु, त्याची कोणताही दखल न घेतल्याने आज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वरील दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ही खाण बेकायदा पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारला याचा जबरदस्त फटका बसला असून करोडो रुपयांचा महसूलही बुडाला आहे. या प्रकरणात खाण मालक आणि सरकारी अधिकार्‍यांनी संगनमताने सुमारे ३० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा युक्तिवाद आज न्यायालयात करण्यात आला. मुख्तार मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध तसेच ही बेकायदा खाण सुरू ठेवण्यात मदत करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद करावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. तक्रारीत काशिनाथ शेटये यांनी यावेळी युक्तिवाद केला.
या खाणीतून आत्तापर्यंत ५० हजार टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे. त्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त खोदकाम केले गेले आहे. तरीही संबंधित खात्याने या खाणीला एकही कारणे दाखवा नोटीस बजावलेली नाही. राज्य सरकारचे खाण संचालनालय अशा बेकायदा खाणींना प्रोत्साहनच देते आहे, असाही युक्तिवाद करण्यात आला. त्याप्रमाणे यात मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही सहभागी आहेत, असाही दावा केला आहे.
सरकारी अधिकार्‍यांसह कावरे पंचायतीचे सरपंच आणि सचिव यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन कायदा ७, ८, ९, १०, ११, १२ व १३ तसेच, २१७, २१८, ४०५, ४०९, ४२०, ४६८, ४७१ आणि १२०(ब) कलमानुसार गुन्हा नोंद करून चौकशी करावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

No comments: