Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 March, 2011

बगल रस्त्यावरून पंचवाडीत दोन गटात हाणामारी

• चर्चिल यांना घेराव • परस्पर विरोधी तक्रार

फोंडा व सावर्डे, दि. ११ (प्रतिनिधी)
पंचवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातील सेझा गोवा कंपनीच्या नियोजित बगल रस्ता आणि बंदर प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या पाहणीच्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चील आलेमाव यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण होऊन मारहाणीची घटना घडली असून यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. बगल रस्ता व बंदर प्रकल्पाला विरोध करणार्‍या लोकांनी मंत्री श्री. आलेमाव यांना घेराव घातला. रस्ता वाहतुकीसाठी बंद करून सदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी पंचवाडी बचाव समितीचे क्रिस्तेव डिकॉस्टा आणि श्रीमती मारिया आगोस्तीन कॉस्ता यांनी परस्पर विरोधी तक्रारी फोंडा पोलिस स्थानकावर दाखल केल्या आहेत.
पंचवाडी ग्रामपंचायत क्षेत्रातून खनिजाची वाहतूक करण्यासाठी बगल रस्ता व बंदर प्रकल्प उभारण्यासाठी सेसा गोवा कंपनीने प्रयत्न चालविले आहेत. ह्या प्रकल्पामुळे गावातील पर्यावरणाचा र्‍हास होणार असल्याने पंचवाडी बचाव समितीच्या झेंड्याखाली नागरिक एकत्र आले असून या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांनी यापूर्वी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या पणजी येथील निवासस्थानाजवळ निदर्शने करून त्यांना निवेदन सादर करून बगल रस्ता व बंद प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. पंचवाडी बचाव समितीतर्फे गेल्या कित्येक महिन्यापासून ह्या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. खनिज वाहतूक करण्यासाठी नव्याने तयार करण्यात येणार्‍या बगल रस्त्यामुळे पंचवाडी गावातील शेती, बागायतीची हानी होणार असल्याने ह्या बगल रस्त्याला विरोध केला जात आहे. ह्या रस्त्यामुळे काजू व इतर झाडांची कत्तल होणार असल्याने लोकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे ह्या नियोजित रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
ह्या बगल रस्त्याची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चील आलेमाव सरकारी अधिकार्‍याच्या समवेत शुक्रवार ११ मार्च रोजी सकाळी पंचवाडी गावात आले होते. यावेळी स्थानिक आमदार महादेव नाईक उपस्थित होते. नियोजित बगल रस्त्याच्या जागेची पाहणी केल्यानंतर मंत्री श्री. आलेमाव यांनी विचार मांडताना काही आक्षेपार्ह विधाने केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रकल्प विरोधकांनी मंत्री आलेमाव यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यानंतर बगल रस्ता व बंदर प्रकल्प समर्थक व विरोधक यांच्यात मारामारीची घटना घडली. ह्या प्रकल्पाला विरोध करणार्‍या लोकांनी रस्ता फोंडा - सावर्डे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करून सेझा कंपनीचा नियोजित बगल रस्ता व बंदर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने मंत्री आलेमाव यांनी सावर्डेमार्गे मडगावाला परत जाणे पसंत केले.
पंचवाडी बचाव समितीचे क्रिस्तेव डिकॉस्टा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पन्नास लोकांनी समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून दुखापत केली आहे असे म्हटले आहे. ह्या तक्रारीत १६ संशयितांची नावे देण्यात आली आहेत. तर मारिया कॉस्ता हिने आपण रस्त्यावरून जात असताना पन्नास जणांच्या जमावाने मारहाण करून दुखापत केली आहे, असे म्हटले आहे. तिने तिघांची नावे आपल्या तक्रारीत दिली आहेत.
ह्या घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पंचवाडी गावात निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी घटना टळली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय दळवी, साहाय्यक उपनिरीक्षक श्री. नाळकर तपास करीत आहेत. याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

No comments: