Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 March, 2011

उद्योग उच्चाधिकार बैठकीत ७ प्रस्तावांना मंजुरी

• १०९.७८ कोटींची गुंतवणूक • ३४५ नवीन रोजगार

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)
उद्योग खाते उच्चाधिकार समितीच्या गेल्या ७ मार्च रोजी झालेल्या बैठकीत एकूण ७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सुमारे १०९. ७८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार्‍या या प्रस्तावांत दोन नवीन उद्योग तथा उर्वरित विस्तारीकरणाचा समावेश आहे. या उद्योगांद्वारे ३४५ जणांना नवीन रोजगार तर २४६ जणांचे रोजगार नियमित होणार आहेत.
उद्योगमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील उद्योग उच्चाधिकार समितीची बैठक गेल्या ७ मार्च रोजी पर्वरी मंत्रालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील औद्योगिक विकासाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, विविध उद्योगांना अतिरिक्त विजेची आवश्यकता आहे व ती पुरवण्यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीसमोर असलेल्या प्रस्तावांपैकी ७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यात ‘मेसर्स स्वॅनसन प्लॅस्टिक्स (इंडिया) प्रा. लि.’ (१२.९० कोटी) व ‘मेसर्स मार्क बायोसायन्सीस लि.’ (३७.५२ कोटी) हे दोन नवीन उद्योग होंडा व पिळर्ण येथे सुरू होणार आहेत. या व्यतिरिक्त विस्तारीकरण करण्यात येणार्‍या उद्योगांत ‘मेसर्स खवंटो मायक्रोफाईन प्रोडक्ट्स लि., (पिसुर्ले सत्तरी), मेसर्स ग्वाला क्लोझर्स (इंडिया) प्रा. लि. ( हरवळे), मेसर्स क्रोम्पटन ग्रीव्हस लि. (कोलवाळ), मेसर्स मॅर्क लि. (फोंडा) यांचा समावेश आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील मेसर्स श्रद्धा इस्पात प्रा. लि. या कंपनीचे नोंदणीकरण नियमित करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

No comments: