Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 March, 2011

गुंड प्रवृत्तीला उखडून टाका


पर्रीकरांचे आवाहन

‘पणजी फर्स्ट ’ चा विजय निश्‍चित

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)
भूमाफिया, मनी लँडर व गुंड प्रवृत्तीला राजकारणातून उखडून टाकण्याची नामी संधी पणजीवासीयांना महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले. बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधाची लाट संपूर्ण महापालिका क्षेत्रात पसरली आहे. पणजी शहराचे हित कशात आहे याची खात्री पणजीकरांना झाल्याने ‘पणजी फर्स्ट ’ पॅनलला स्पष्ट बहुमत निश्‍चित आहे, असा ठाम आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत ताळगावाचे भाजप नेते आग्नेलो सिल्वेरा हजर होते. महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बहुतांश भागांत प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या असता मतदारांनी प्रकट केलेल्या भावना अत्यंत बोलक्या ठरल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले. महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची याचा दृढ निश्‍चय मतदारांनी यापूर्वीच बनवला आहे व त्याचे सकारात्मक पडसाद निवडणूक निकालातून दिसून येतील. पणजीकरांचा कल आपल्या विरोधात जात असल्याची जाणीव बाबूश यांना झाल्यानेच ते आता गुडांकरवी मतदारांना धमकावण्याचे व मतदारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. पणजीचे पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर हे राजकीय दबावाखाली वावरत असून राज्य निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी व त्यांच्याजागी अन्य अधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणीही पर्रीकर यांनी केली. सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरणारे बाबूश आता महापालिका निवडणुकीत आपला पराभव डोळ्यांसमोर पाहून अस्वस्थ बनले आहेत. याचे परिणाम म्हणूनच त्यांनी गुंडांना हाताशी धरून दहशत पसरवण्याचे जोरदार प्रयत्न चालवल्याची टीका पर्रीकर यांनी केली.
ताळगावचा संपूर्ण विकास झाल्याच्या बाता किती खोट्या आहेत याची प्रचितीच या भागांत फिरल्यानंतर झाल्याचे पर्रीकर म्हणाले. इथे पाणी टंचाई, विजेचा लपंडाव, रस्त्यांची दुर्दशा व कचर्‍याची भीषण परिस्थिती उद्भवल्याचे प्रकर्षाने दिसून आले. ताळगावातील जनता या परिस्थितीमुळे त्रस्त बनली आहे. भाजपकडून या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यापुढे ताळगावात भाजप सक्रिय होणार असून या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजप गंभीरपणे वावरणार असल्याचे पर्रीकर यांनी जाहीर केले. या भागातील एका व्यक्तीने वृत्तपत्रांत बाबूश मोन्सेरात यांच्यावर सडकून टीका केल्याने या व्यक्तीच्या घरासमोरील झाडांच्या कुंड्या फोडून टाकण्याची कृती घडल्याचे पर्रीकर म्हणाले. ऍड. आयरिश रॉड्रगीस यांच्यावर हल्ला प्रकरणातील प्रमुख संशयित संदीप वायंगणकर याच्या दहशतीबाबत तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई करण्यास हयगय होत असल्याचे ते म्हणाले. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना खबरदारी म्हणून ताब्यात घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाने मतदानादिवशीच मतमोजणी हाती घेण्याची सर्व तयारी केल्याने त्यात बदल करण्याची आवश्यकता नाही, असे मत पर्रीकर यांनी व्यक्त केले. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. गुडांवर कडक कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवण्याची काहीच गरज नाही, असेही ते म्हणाले. बाबूश मोन्सेरात यांना एकदा पोलिसांनी आपला हिसका दाखवला आहेच, त्यामुळे आता वेगळी पद्धत अवलंबण्याची अजिबात गरज भासणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. राजकारणात धोकादायक ठरू शकणार्‍या या वृत्तीचा कायमचा निकाल पणजीकरांनी लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रभाग क्रमांक १८ मध्ये माजी महापौराच्या घरामागे सांडपाण्याचा डबकाच साठला आहे. प्रभाग १६ मध्ये टी. बी. इस्पितळ वसाहतीत मोठा कचर्‍याचा ढीग निर्माण झाला आहे. गोवा विद्यापीठाच्या रस्त्यालगत काय परिस्थिती झाली आहे ती पाहायलाच नको, असे सांगून ताळगावाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेच दिसून आले, असेही पर्रीकर म्हणाले.

No comments: