Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 March, 2011

श्रीपाद नाईक व पर्रीकर यांच्या सहभागामुळे

’पणजी फर्स्ट’ च्या प्रचारात उत्साह

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
उत्तर गोव्याचे खासदार तथा भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या बरोबरीने ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पणजी महापालिका क्षेत्रात फिरण्यास सुरुवात केल्याने पणजी फर्स्टच्या उमेदवारांत उत्साह संचारला आहे. माजी मुख्यमंत्री श्री. पर्रीकर व माजी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेले श्रीपाद नाईक या दोन्ही निःस्वार्थी व कर्तृत्ववान नेत्यांच्या प्रचारातील सहभागामुळे पणजीतील लोकांची मते पणजी फर्स्टच्या उमेदवारांच्या बाजूने झुकण्यास सुरुवात झाल्याचे चित्र महापालिका क्षेत्रात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले आहे.
‘पणजी फर्स्ट’च्या युवा उमेदवारांच्या त्यांनी या पूर्वी केलेल्या जनसेवेची पावती त्यांना मिळावी तसेच विद्यमान भ्रष्टाचारी सत्ताधारी मंडळ सत्ताभ्रष्ट होऊन नव्या निःस्वार्थी व विकास करणार्‍या मंडळाकडे सत्ता यावी म्हणून पणजी महापालिका क्षेत्रातील नामवंत मंडळी कधी नव्हे ती एकत्र झालेली असून जादातर लोकांचे तथा विचारवंतांचे मत हे विद्यमान मंडळ पायउतार व्हावे व पणजी फर्स्टची सत्ता यावी आहे. त्यासाठी ही मंडळी विविध माध्यमातून आपल्या परीने प्रचार करताना दिसत आहेत.
दरम्यान श्री. पर्रीकर व खासदार नाईक यांनी पणजी फर्स्टच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक प्रभागातील मतदारांकडे संपर्क साधण्यास प्रारंभ केला असून मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी दृष्टीस पडत आहे.

आता नोकरीचे आमिष
पणजी महापालिकेवर आपली सत्ता पुन्हा यावी यासाठी विकास आघाडीच्या उमेदवारांकडून विविध किमती वस्तूंचे वाटप होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे सतर्क झालेल्या निवडणूक आयोगाने ताळगाव भागात आपले निरीक्षक तैनात केले आहेत. मात्र त्यामुळे हादरलेल्या विकास आघाडीच्या उमेदवारांनी वस्तू वाटताना पकडले गेल्यास किंवा तसे सिद्ध झाल्यास अपात्रता ओढवण्याचा धोका आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला सरकारी नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवण्यास सुरू केले आहे. गेली पाच वर्षे काय झाले ते विसरून जा व एकवेळ निवडून द्या! आपले सरकार सत्तेवर आहे त्यामुळे सत्ता आम्हांलाच द्या! प्रत्येकाला सरकारी नोकरी देतो. असे आश्‍वासन विकास आघाडीचे उमेदवार प्रचाराच्यावेळी प्रत्येकाला देत आहेत.
एवढे दिवस मंत्री आश्‍वासने देत होते पण सरकारकडेच नोकर्‍या नाहीत. त्यामुळे हे मंत्री तरी कुठून नोकर्‍या देणार असा प्रश्‍न होता. मात्र सध्या पालिकेच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवारच नोकर्‍या देण्याचे आमिष दाखवत आहेत हे आश्‍चर्य आहे. त्याचप्रमाणे गेली पाच वर्षे राज्यात व महापालिकेत सत्ता असूनही नोकर्‍या दिल्या नाहीत आणि आता मतासाठी नोकर्‍यांची आमिषे दाखवणार्‍या या भ्रष्टाचारी लोकांवर आम्हां युवकांचा विश्‍वासच नाही असे प्रतिपादन एका शिक्षित युवकाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले. युवकांचा अनैतिक गोष्टीसाठी वापर करणार्‍यांना सत्ताभ्रष्ट केलेच पाहिजे! असेही तो म्हणाला. अशाच प्रतिक्रिया अनेक युवकांनी व्यक्त केल्या असून युवकांच्या कल्याणासाठी सत्ताबदल हवाच असे या युवकांनी ठासून सांगितले आहे.

No comments: