Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 6 March, 2011

पणजी शहराला वाचवण्याची शेवटची संधी : अशोक नाईक

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)
गेल्या पाच वर्षांत पणजी महापालिका क्षेत्राच्या विकासाबाबत झालेल्या अक्षम्य फरफटीचा वचपा काढून या सुंदर शहराला एक नवी झळाळी प्राप्त करून देण्याचा संकल्प ‘पणजी फर्स्ट’ पॅनलने सोडला आहे. विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड व शहरासमोरील बिकट समस्यांवर मात करणार्‍या कल्पक योजना राबवून राजधानीचे रूपांतर देशातील एका अव्वल शहरात करण्याची योजनाच या गटाने आखली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या कुशल नेतृत्वाचे मार्गदर्शन ही या पॅनलची भक्कम बाजू असून पणजी शहराला वाचवण्याची ही शेवटची संधी आहे असे जाहीर आवाहन माजी महापौर तथा ‘पणजी फर्स्ट’ पॅनलचे नेते अशोक नाईक यांनी केले.
पणजी महापालिकेला लागलेले निष्क्रियतेचे ग्रहण दूर करण्याची धुरा आता समस्त पणजीवासीयांना आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारच्या निष्क्रिय नेतृत्वाचे गंभीर परिणाम संपूर्ण गोव्याला भोगावे लागत आहेत. राज्यातील विविध भागांत गोमंतकीय जनता गोवा वाचवण्याचा निर्धार करून बाहेर पडली असतानाच पणजी महापालिकेच्या निवडणूक कौलाकडे एका आश्‍वासक व क्रांतिकारी नजरेने ही जनता पाहत आहे. राज्याची राजधानी असलेल्या पणजी शहरवासीयांनी मनोहर पर्रीकर यांना सतत तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले व एक नवा इतिहास रचला. माजी मुख्यमंत्री व आता विरोधी पक्षनेते या नात्याने श्री. पर्रीकर यांची स्वच्छ व विकासात्मक कार्यपद्धती अजूनही गोमंतकीयांच्या स्मृतीत ताजी आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत संपूर्ण जनता पर्रीकरांकडेच आशेचा एकमेव किरण या नजरेने पाहत आहे. त्यांचेच मार्गदर्शन लाभलेल्या ‘पणजी फर्स्ट’ पॅनलच्या हाती महापालिकेचे भवितव्य सोपवून एका नव्या राजकीय परिवर्तनाची मुहूर्तमेढ पणजीवासीयांनी रोवावी असे आवाहन अशोक नाईक यांनी केले.
पणजी व पर्यायाने संपूर्ण गोवा वाचवण्यासाठी ही निवडणूक म्हणजे एक मिशनच आहे. त्यासाठीच प्रत्येक पणजीकराने आपल्या मतदानाचा हक्क बजावून त्याला यश मिळवून द्यावे. सुशिक्षित, बुद्धिजीवी, जाणकार व त्याचबरोबर कष्टकरी समाज या सर्व घटकांचा मिलाफ येथील मतदारांत होतो. पैशांच्या नोटा व चैनीच्या वस्तूंच्या आमिषांना बळी पडून आपला स्वाभिमान व प्रतिष्ठा विकण्याचा मूर्खपणा पणजीवासीय कदापि करणार नाहीत. मनोहर पर्रीकरांसारख्या नेत्याची निवड केलेला हा मतदार आपली शान महापालिकेच्या निवडणुकीतही कायम राखणार आहे. गोव्याचा विद्ध्वंस करू पाहणार्‍या भ्रष्ट व आपमतलबी नेतृत्वाला सडेतोड प्रत्युत्तर देऊन संपूर्ण राज्यासमोर एक नवा आदर्श निर्माण करण्याची सुवर्णसंधी पणजीवासीय वाया घालवणार नाहीत असा विश्‍वासही श्री. नाईक यांनी व्यक्त केला. मतदान हे एकदाच करावयास मिळते पण त्याचे परिणाम मात्र पुढील पाच वर्षे भोगावे लागतात. त्यामुळे मतदान करताना प्रत्येकाने दूरदृष्टीचा विचार करूनच आपला हा हक्क बजावणे अपेक्षित असते. पणजीची चिंता वाहणारे लोक पहिल्यांदाच या निवडणुकीच्या निमित्ताने बाबूश मोन्सेर्रात यांच्याविरुद्ध एकवटले आहेत. त्यामुळेच ‘पणजी फर्स्ट’च्या मागे ठामपणे उभे राहून पणजीवासीयांनी या कार्यात आपला सहभाग द्यावा. पुढील पाच वर्षे पश्‍चात्ताप करण्यापेक्षा आत्ताच खबरदारी घेणे उचित ठरेल. साहजिकच पणजी शहराला स्वच्छ व विकासात्मक प्रशासन मिळवून देण्यासाठी ‘पणजी फर्स्ट’ हा एकमेव पर्याय पणजीवासीयांसमोर आहे असेही श्री. नाईक यांनी म्हटले आहे.

No comments: