Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 March, 2011

मतमोजणी १३ रोजीच

निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्ज

कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस तैनात

पणजी, दि. ११(प्रतिनिधी)
पणजी महापालिका निवडणूक मतमोजणी १३ रोजीच होईल अशी ठाम भूमिका घेत कायदा सुव्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस कुमक घेण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. मतमोजणीच्या दिवशी रात्रीच्या वेळी विजयी मिरवणुका काढण्यास तसेच फटाके लावण्यास बंदी घालून महापालिका क्षेत्रात १४४ कलम लागू करण्यात आल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी सांगितले.
पणजी महापालिका निवडणूक तयारीच्या सज्जतेची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. वर्धन बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव एस. वाय. परब व निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी साबाजी शेटये हजर होते.
पणजी महापालिका क्षेत्रातील मतदारसंख्या ३२०९० असून तीस प्रभागांसाठी ६८ मतदानकेंद्रे असतील. मतदानासाठी मतदान यंत्रांचा वापर केला जाणार असून प्रत्येक मतदान केंद्रांवर किमान तीन मतदान यंत्रे ठेवण्यात येणार असल्याने जादा वेळ रांगेत राहावे लागणार नाही. पणजी महापालिका क्षेत्रातील मतदारांत ८६ अपंगांचा समावेश असून त्यांना मतदानासाठी विशेष खुर्चीची सोय केली जाणार आहे. मतदारयादीतील ८६ मतदार मृत झाल्याची नोंद आहे व या लोकांच्या नावे कुणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तात्काळ अटक करण्यात येणार असल्याचेही श्री. वर्धन म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांची मतदारसंख्या ६६५० आहे. बेपत्ता मतदारयादीत ३७८ मतदारांचा समावेश आहे तर कौटुंबिक पार्श्‍वभूमी असलेल्या १६ मतदारांची नोंद आहे. प्रत्येक मतदाराला ओळखीसाठी पुरावा सादर करावा लागणार आहे. मतदान देखरेख पद्धत (पीएमएस) यंत्रणेद्वारे संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात येणार असून प्रत्येक मतदाराची संगणकावर नोंद होणार आहे. या पद्धतीत कोणत्याच प्रकारे बोगस मतदान होण्याची शक्यता नाही, असे श्री. वर्धन यांनी स्पष्ट केले. ११ क्षेत्रीय दंडाधिकार्‍यांसोबत ९ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानासाठी ४५० पोलिस, २२२ सुरक्षा जवान व १२० अतिरिक्त पोलिस कुमक कायदा सुव्यवस्थेवर नजर ठेवणार आहे. संवेदनशील म्हणून एकही प्रभाग नसले तरी काही ठरावीक ठिकाणी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. येत्या चोवीस तासांत खबरदारी म्हणून काही जणांना अटक होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
मतमोजणीची माहिती मतदारांना मिळण्यासाठी चार ठिकाणी बड्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. त्यात गोवा मनोरंजन संस्था, मिरामार, कदंब बसस्थानक व आझाद मैदान आदी ठिकाणांचा समावेश असेल. लोकांनी मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी न करता याठिकाणी निकालाची माहिती मिळवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. www.northgoa.nic.in या संकेतस्थळावर मतमोजणीची इत्थंभूत माहिती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

मतदान गुप्तच राहणार
काही ठिकाणी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांवर दबाव टाकण्यात येत असून ते कुणाला मते देतील याचे छायाचित्रण होणार असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात मतदान केंद्रावर येणार्‍या मतदाराचे संगणकावर छायाचित्रण होत असले तरी प्रत्यक्ष मतदान यंत्रावर मत देताना छायाचित्रण होणार नसून प्रत्येकाचे मतदान गुप्त राहणार आहे. मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments: