Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 2 July, 2010

रस्ता ते संसद असा लढा उभारणार

म्हापसा येथील महागाईविरोधी सभेत गोपीनाथ मुंडे यांचा इशारा
म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी): उपचार करायचे सोडून केंद्र सरकारने महागाईने ग्रस्त सामान्य माणसाच्या जखमांवर पुन्हा इंधन दरवाढ करून मीठ चोळले आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच महागाई निर्देशांक आणि चलनवाढ दोन्ही दोन आकडी झालेली पाहणे देशवासीयांच्या नशिबी आले. आम आदमीला महागाईची झळ पोहोचणार नाही याची दक्षता घेण्याचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी दिलेले वचन न पाळणाऱ्या केंद्र सरकारचा आपण तीव्र शब्दांत धिक्कार करतो, असे सांगून इंधन दरवाढ मागे न घेतल्यास रस्त्यापासून संसदेपर्यंत लढा उभारू, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी म्हापसा येथे भारतीय जनता पक्षाने इंधन दरवाढीविरोधात आयोजित केलेल्या सभेत केली.
केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात भाजपने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बोलाविलेल्या या गोव्यातील पहिल्या सभेत मुंडे यांनी कॉंग्रेस सरकारवर कडाडून टीका केली. महागाईविरोधी आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही तर सामान्य जनतेचे आहे, असे सांगून त्यांनी आम आदमीने मोठ्या संख्येने यात सहभागी होऊन सरकारला आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन केले. वाजपेयी सरकारच्या काळात जो पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस व केरोसीनचा भाव अनुक्रमे २८, २२, १५० व ६ इतका होता तो आता अनुक्रमे ५२, ४१, ३५० व ३० इतका चढला असल्याचे लोकांच्या नजरेस आणून दिले. सध्या महागाई निर्देशांक ११ टक्के तर चलनवाढ १६ टक्क्यांवर पोचल्याचे सांगून जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपैकी कोण महागाईच्या विरोधात आहे आणि कोण महागाईच्या बाजूने आहे हे देशातील जनतेला दाखवून देण्यासाठीच देशाच्या इतिहासात पहिल्यांदा कपात प्रस्ताव आणण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचे मुंडे म्हणाले. या प्रस्तावावेळी श्रीपाद नाईक यांनी महागाईच्या विरोधात तर कॉंग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी सरकारच्या म्हणजेच महागाईच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी सार्दिन यांचे नाव न घेता सांगितले. सरकारने लवकरात लवकर अधिवेशन बोलावून महागाईच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे आव्हान त्यांनी सरकारला दिले. गोव्यातील कॉंग्रेस सरकार हे देशातील सर्वांत भ्रष्ट सरकार असल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाने आणि आता पुन्हा केलेल्या इंधन दरवाढीमुळे प्रत्येक सर्वसामान्य घराचा अर्थसंकल्प चुकल्याचे सांगून सरकारच्या अन्यायाने आता परिसीमा गाठली आहे, असा आरोप त्यांनी केला. आता देश वाचविण्यासाठी सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे सांगून दि. ५ रोजी भाजपने पुकारलेल्या बंदवेळी गोव्यात कडक बंद पुकारण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
तत्पूर्वी, मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड पेट्रोलचा भाव १५० डॉलर प्रति बॅरल एवढा वधारला असताना सामान्य माणसाला पेट्रोल ४९.८० पैसे दराने मिळत होते मग आता तो भाव ७० डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला असताना इंधन दरवाढीचे कारण काय, असा सवाल करून आम आदमीच्या भाषेत पेट्रोलच्या किमतीचे गणित मांडून दाखवले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरानुसार एक लीटर पेट्रोलची किंमत १७ ते १८ रुपये आहे. त्यानंतर त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रियेचा खर्च ७ ते ८ रुपये प्रति लीटर धरल्यास पेट्रोलची किंमत केवळ २५ रुपये होते. अशा वेळी ते ५२ रुपयांना विकण्याऐवजी सरकारने अबकारी कर कमी करून सामान्य माणसाला महागाईच्या संकटातून सोडविण्याची त्यांनी मागणी केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वाढत्या महागाईमुळे केवळ गरिबांचेच नव्हे तर मध्यमवर्गीयांचेही हाल होऊ लागल्याचे सांगून एकीकडे पंतप्रधान देश प्रगतीच्या दिशेने झेपावत असल्याचा बाता मारीत असताना दुसरीकडे सामान्य माणूस अन्नाला मोताद होत असल्याची टीका केली. गोवेकराच्या ताटातून मासे कधीच लुप्त झाले होते, आता तर डाळ आणि कडधान्येसुद्धा मध्यमवर्गीय माणसाला परवडेनाशी झाल्याचे ते म्हणाले. सामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढून मंत्री विदेश दौरे साजरे करीत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसौझा यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ देशाच्या पंतप्रधानपदी असूनही सामान्य नागरिकाला महागाईला सामोरे जावे लागत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करून ५ रोजी भाजपने पुकारलेल्या बंदमध्ये जनतेने स्वेच्छेने सामील होण्याचे आश्वासन केले.
भाजप हा लोकांचा पक्ष असून पक्षाला लोकहितैषी आंदोलनांचा मोठा इतिहास असल्याचे गोवा भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी सांगितले. यापूर्वी कोकण रेल्वे, रामजन्मभूमी यांसारख्या आंदोलनांपासून सेझविरोधी आणि उच्च सुरक्षा नंबरप्लेट विरोधी आंदोलनांसारखी आंदोलने पक्षाने केलेली असून विरोध दडपून टाकण्यासाठी कितीही खटले भरले तरी पक्ष डगमगणार नसल्याचे सांगून ५ रोजी पुकारण्यात आलेला बंद कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी एकीकडे दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत गॅस जोडणी द्यायची आणि दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅसचा भाव ३५ रुपयांनी वाढवायचा, ही निव्वळ फसवणूक असल्याचा आरोप केला.
यावेळी भाजप उपाध्यक्ष कुंदा चोडणकर, अनिल होबळे यांनीही आपल्या भाषणात कॉंग्रेसच्या धोरणावर हल्ला चढवून महागाईविरोधी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोकांना केले. यावेळी व्यासपीठावर म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, साळगावचे आमदार दिलीप परुळेकर, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, मयेचे आमदार अनंत शेट, डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------
'पवार, पटेल यांनी पदत्याग करावा'
स्वीस बॅंकेतील व आयपीएलमधील काळा पैसा लोकांच्या कल्याणासाठी वापरल्यास देशातील महागाई त्वरित दूर होईल असे सांगून शशी थरूरांप्रमाणेच आयपीएलसाठी आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनाही जुलैमधील लोकसभा अधिवेशनावेळी पद सोडण्यास भाग पाडू, असे मुंडे यांनी सांगितले.

No comments: