Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 March, 2010

अबकारी खाते व मद्य तस्करांचे साटेलोटे!

चेकनाके चुकवून लाखोंंच्या मद्यसाठ्याची गोव्यातून तस्करी

सावंतवाडी व पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - गोव्यात ड्रग माफिया व पोलिसांचे साटेलोटे उघड झाले आहेच, पण आता अबकारी खात्याचे अधिकारी व बेकायदा मद्य तस्करांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडील अबकारी खात्याची नजर चुकवून राज्यातून मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी सुरू आहे. अबकारी खाते व वाहतूक खात्याचे चेकनाके चुकवून लाखो रुपयांचा मद्यसाठा सीमेबाहेर नेला जातो. महाराष्ट्र पोलिस व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खाते यांच्यातर्फे गोवा- महाराष्ट्र सीमेवर अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आला, त्यामुळे या बेकायदा व्यवसायात अबकारी खाते, वाहतूक खाते व मद्य तस्करांच्या अनेक टोळ्यांचे साटेलोटे असावे, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अबकारी खात्यात बनावट दाखल्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात मद्याची आयात होत असल्याचे प्रकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात उघड करून कोट्यवधींच्या मद्य घोटाळ्याचा कागदोपत्री पुराव्यांसह पर्दाफाश केला होता. या घोटाळ्याची चौकशी "सीबीआय'मार्फत करावी, ही पर्रीकरांची मागणी मान्य करण्याचे धाडस मुख्यमंत्री कामत यांनी दाखवले नाही. वित्त सचिवांमार्फत चौकशी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आता या प्रकरणाला तीन महिने उलटत आले तरी अद्याप या चौकशीची सूत्रेच हलत नसल्याचे उघड झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री या चौकशीत कोलदांडा घालत असल्याची चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात गोवा- महाराष्ट्र सीमेवर गोव्यातून मोठ्या प्रमाणात मद्यसाठ्याची तस्करी सुरू असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या जानेवारीत गोव्यातून अवैध पद्धतीने सुमारे सात लाख रुपयांचा मद्यसाठा घेऊन कोल्हापूरमार्गे वाहतूक करणारा टेंपो बांदा पोलिसांनी पकडल्यानंतर काल गोव्याहून पुण्याकडे जाणाऱ्या एका खाजगी मिनी आरामबसवर छापा टाकून सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने विनापरवाना वाहतूक होणारा एकूण आठ लाख ३४ हजार ५६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
दरम्यान, शासकीय गाडीतून मद्य वाहतूक करणाऱ्या एका गाडीचालकाने सावंतवाडी येथील पोलिसांना गुंगारा देण्याचाही प्रकार काल घडला. कृषी विभाग, भारत सरकार असे नाव असलेल्या गोवा परवान्याच्या ऍम्बेसिडरमधून मद्य वाहतूक होत असल्याची माहिती गोव्यातीलच पोलिसी खबऱ्याने सावंतवाडी पोलिसांना दिली होती. सदर वाहनात मद्याच्या बाटल्या घालताना त्याला दम भरला असता "शासनाची गाडी आहे. पोलिसांत ती थांबविण्याची हिंमत आहे काय,' असा उलट प्रश्न विचारून संबंधित चालकाने गाडीत मद्याच्या बाटल्या भरल्या. ही माहिती सदर खबऱ्याने सांवतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार शहरात सापळा रचण्यात आला; मात्र तत्पूर्वीच त्या गाडीचालकाने पोलिसांना गुंगारा दिल्याने रात्री उशिरापर्यंत शहरात नाकाबंदी करण्यात आली.
दरम्यान, गोव्यात उत्पादन केलेल्या मद्यावर वेगवेगळ्या बड्या कंपन्यांचे लेबल लावून ते मद्य कर्नाटक व आंध्र प्रदेशात विकले जाते, असा संशय बांदा पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टेंपोतून हस्तगत केलेल्या मद्याच्या बाटल्यांवर "एस. वीरा बिसलरी मिनरल लिमिटेड' या कंपनीचे लेबल लावले होते. या कंपनीचे अधिकार "डिस्टिल ब्रॅंड वॉटर बार' हैदराबाद यांना बहाल आहेत. प्रत्यक्षात हे मद्य गोव्यातच तयार होते व बड्या कंपन्यांच्या लेबलखाली बनावट पद्धतीने तयार होऊन ते जादा दराने इतरत्र विकले जाते, असाही पोलिसांचा कयास आहे.
महाराष्ट्र पोलिसांकडून मद्याच्या तस्करीबाबत गंभीर दखल घेण्यात आली आहे व या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न आरंभले आहेत. तथापि, गोवा पोलिस व अबकारी खात्याकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
मुंबई-गोवा महामार्गावरून जाणाऱ्या या बसमधील (एमएच ०९ बीसी ४०४२) डिकीत गोवा बनावटीच्या मद्याची खोकी ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली चेक नाक्यावर बसची तपासणी करण्यात आली असता विनापरवाना दारुसाठा सापडला. याप्रकरणी आरोपी सुरेश रमेशलाल मिखिजा (२६), होनाजी लक्ष्मण आडागळे(३२ - दोघेही राहणार अहमदनगर) तसेच भय्यास खतीब (३१) व वीराप्पा बसप्पा गणमुखी (३७ - दोघेही राहणार कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिनी बस गोव्याहून कोल्हापूरमार्गे पुण्याला जात होती. ही कारवाई महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क खात्याचे जिल्हा अधीक्षक उल्हास नाईक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक जे. एस. पवार, दुय्यम निरीक्षक गोगावले जमादार भागवत तसेच जवान सूरज चौधरी, सावंत, शेलार, कदम, बिरामदार, चाटे यांनी संयुक्तपणे केली.

No comments: