Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 March, 2010

संस्कृती प्रतिष्ठानतर्फे महिला पत्रकारांचा गौरव

स्त्री व्याख्यानमालेचे उद्घाटन
पणजी,दि.१०(प्रतिनिधी): एखाद्या राज्यात स्त्रीला कितपत सन्मान आहे, त्या आधारावरच त्या राज्याची संस्कृती कळते, असे प्रतिपादन कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी केले. केवळ भौतिक प्रगती झाली म्हणजे राज्य किंवा देश सुधारला असे होत नाही पण प्रत्यक्षात व्यक्तिविकासावरच प्रगतीचे निकष ठरतात, असेही ते म्हणाले.
संस्कृती प्रतिष्ठान, गोवा शाखा व स्वामी विवेकानंद सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्त्री व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खांडेपारकर, संस्कृती प्रतिष्ठानच्या संयोजिका संगीता जाधव, उपसंयोजिका ज्योती कुंकळकर, गौरी काटे आदी मान्यवर हजर होते.
जागतिक महिला दिन शताब्दीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या महिला पत्रकारांचा गौरव श्री. लोलयेकर व श्री. खांडेपारकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात ज्योती धोंड ( गोवादूत), सुहासिनी प्रभुगांवकर (गोमंतक), लीना पेडणेकर (तरुण भारत), प्रीतू नायर (टाइम्स ऑफ इंडिया), डॉम्निका पिंटो (नवहिंद टाइम्स) व अन्वेषा सिंगबाळ (सुनापरान्त) यांचा समावेश होता. सोसायटीच्या कार्यालयात गेली वीस वर्षे सेवा बजावणाऱ्या रीमा शिरोडकर यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
प्रमोद खांडेपारकर यांनी आपले विचार व्यक्त करताना महिला आरक्षण विधेयक संमत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महिला पुढे येणार, असा विश्वास व्यक्त केला. महिला या पुरुषांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात असे म्हटले जाते, त्यामुळे महिलांच्या सहभागामुळे भ्रष्ट्राचारावर काही प्रमाणात नियंत्रण येणार आहे, असेही ते म्हणाले. घरातील स्त्री सशक्त झाली तरच कुटुंब सशक्त होईल व त्यामुळे स्त्रीला योग्य मान मिळायलाच हवा, असेही ते म्हणाले.
सुरुवातीला संगीता जाधव यांनी प्रास्ताविक केले. ज्योती कुंकळकर यांनी गौरवमूर्ती पत्रकारांची ओळख करून दिली. सौ. सिनारी यांनी सूत्रसंचालन केले.

No comments: