Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 December, 2009

भारताला जगात 'नंबर वन' करण्याचा निर्धार : नितीन गडकरी

* राष्ट्रवाद हीच भाजपाची विचारधारा.
* दहशतवाद व नक्षलवादाला संपूर्ण विरोध.
* सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी कटिबद्ध
* तीन वर्षांत पक्षसंघटना मजबूत करणार
* शेवटच्या घटकाचा विकास हे अंतिम उद्दिष्ट
* सेवा आणि विकासाची कामे करणार
* पक्षाच्या कामात संघाचा कधीही हस्तक्षेप नाही.
* योग्यतेनुसार काम देऊन कार्यक्षम "टीम' तयार करणार.

नवी दिल्ली, दि. २४ (गजानन निमदेव): 'राष्ट्रवाद' हीच भाजपाी विचारधारा होती, आहे आणि राहील. पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राष्ट्रवाद हीच प्रेरणा आहे आणि याच आधारे काम करताना भारताला जगात "नंबर वन'चे स्थान प्राप्त करून देऊ, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आज येथे प्रथमच आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जात, पात, धर्म, पंथ, भाषा या आधारावर भेदभाव करणे भाजपला मान्य नाही. भाजप शेवटपर्यंत सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
"भारत सर्वांचा आणि सर्व भारताचे' ही भाजपाची धारणा आहे. त्यामुळे मतपेटीचे राजकारण करणाऱ्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेला भाजपात स्थान नाही, असेही त्यांनी सांगितले.
दहशतवाद आणि नक्षलवाद भाजपला मान्य नाही. कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला भाजपचा संपूर्ण विरोध आहे. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करताना गडकरी म्हणाले की, दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणेतील सर्व त्रुटी संपूर्णत: दूर केल्या पाहिजे.
अतिशय लहान वयात पक्षाने माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे, ही फार मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी मी संपूर्ण क्षमतेने पार पाडीन आणि पुढील तीन वर्षांत पक्षसंघटना मजबूत करीन, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षात अनेक दिग्गज नेते असताना राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्याने काम करताना आपल्यावर प्रचंड दबाव राहील का, या प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले, माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह यांच्यासारख्या नेत्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि अटलजींचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाशिवाय मी काम करीन.
अध्यक्षपद तर आपण स्वीकारले, आता "टीम गडकरी' केव्हा, कशी आणि कधी तयार करणार, असे विचारले असता ते म्हणाले की, नवी टीम तयार करण्यासंदर्भात चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांची योग्यता आहे त्यांना योग्य पद दिले जाईल. नवी टीम अतिशय कार्यक्षम असेल, "परफॉर्मन्स ऑडिट'च्या आधारे सहकाऱ्यांना टीममध्ये स्थान मिळेल.
सेवा आणि विकासाचे राजकारण करताना समाजातील अगदी शेवटच्या घटकाला न्याय मिळेल, याकडे आम्ही लक्ष ठेवणार आहोत. "राष्ट्रवाद अब हमारी प्रेरणा है, सुशासनद्वारा विकास हमारा साधन है और अंत्योदय हमारा अंतिम उद्देश है,' असेही गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हस्तक्षेप करीत असल्याचा गडकरी यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. पक्षात काही सगळेच संघाचे स्वयंसेवक नाहीत. माझ्यासारखे जे आहेत, त्यांची जीवननिष्ठाच संघविचारांवर आधारित आहे. संघाने कधीही आम्हाला निर्देश दिले नाहीत की आदेश दिले नाहीत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
तरुण पिढी भाजपकडे आकर्षित व्हावी यासाठी काय करणार, असे विचारले असता गडकरी म्हणाले की, विकास आणि विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, गरिबी दूर करून दरडोई उत्पन्न वाढवू आणि या माध्यमातून मोठ्या संख्येत तरुण-तरुणींना पक्षाशी जोडू.
समाजाच्या ज्या क्षेत्रात आम्ही पोहोचलो नाही, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पुढल्या शंभर वर्षांचा विचार करून विकास व समाजोन्नतीची धोरणे आखू. दलित, आदिवासी, अल्पसंख्यक या सर्वांच्या मनात विश्वास निर्माण करू. अशा प्रकारे पक्षाला मजबुती प्राप्त करून देऊ आणि पर्यायाने देशालाही ताकद देऊ, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
शिस्त हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. पुढल्या काळात हे वैशिष्ट्य आणखी काटेकोरपणे जपले जाईल. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असल्याने कुठल्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपाला मजबुती प्रदान करण्याबरोबरच "चाटुगिरी' बंद केली जाईल, जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांना न्याय दिला जाईल, असे स्पष्ट करतानाच गडकरी म्हणाले की, रालोआला बळकटी देण्यासाठीही आपण प्रयत्न करू. आजच मी जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली आणि पुढील काही दिवसात शरद यादव यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेणार आहे. रालोआ बळकट करणे ही देशासाठी आवश्यक बाब आहे.
मुंडे, गडकरी आणि जावडेकर असे नेते दिल्लीत आल्याने महाराष्ट्र भाजपा "नेतृत्वहीन' झाल्याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले, भाजपात अनेक चांगले कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत, जे पक्षाला दमदार नेतृत्व देऊ शकतील. ही एक प्रक्रिया आहे आणि चालूच राहणार आहे.
पक्षात काम करताना आपण कधी-कधी जिद्दीपणा करता, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणतीही चूक मी एकदा सहन करतो. तीच ती चूक करण्याचा खोडसाळपणा कोणी केला तर ते मी खपवून घेत नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय मी एकटा घेत नाही. सर्वसंमतीने निर्णय घेण्यावर माझा विश्वास आहे.
समान नागरी कायदा, कलम ३७० आणि राम मंदिर या मुद्यांवर भाजपाची जी भूमिका आधीपासून राहिली आहे, त्यात कोणताही बदल झाला नसल्याचे आणि होणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि राजीव प्रताप रुडी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
तडाखेबंद...!
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर गुरुवारी देशाची राजधानी नवी दिल्लीत झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत तडाखेबंद फलंदाजी केली.
देश-विदेशातील वर्तमानपत्रे, वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाहिन्यांचे तीनशेवर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक प्रश्नाला गडकरी यांनी हिंदी-इंग्रजीत समर्पक उत्तरे दिली. प्रश्नांची उत्तरे देताना मधूनच त्यांनी विनोदही केले.
भाजपच्या सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्षांची पहिलीच पत्रकार परिषद असल्याने राजधानीच्या पत्रकार वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती. गडकरी हे राष्ट्रीय राजकारणात अगदीच नवखे आहेत, त्यामुळे ते कसे बोलतात, प्रश्नांची उत्तरे कशी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गडकरी यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास जाणवत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात असल्यासारखी आत्मविश्वासपूर्ण उत्तरे देऊन गडकरी यांनी दिल्लीच्या "मीडिया'वर छाप पाडली.

No comments: