Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 24 December, 2009

कस्टम कार्यालयावर सीबीआयचा छापा

दोन अधिकाऱ्यांची चौकशी
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): मुरगाव अबकारी खात्याच्या कार्यालयात काल उशिरा रात्री केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन कस्टम अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु, हा छापा कशासाठी टाकण्यात आला आहे, याची अधिकृत माहिती देण्याचे अधिकाऱ्याने टाळले, मात्र छापा टाकल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या कारवाईसाठी दिल्ली येथून सीबीआयचा एक उच्च अधिकारीही गोव्यात दाखल झाला आहे.
गोव्यातून विदेशात अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणातील मुख्य सूत्रधार नॉर्मन आझावेदो याला काही दिवसांपूर्वी कस्टम अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने हा छापा टाकल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. टपाल खात्याचा वापर करून सुरू असलेली तस्करी ही आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचा एक भाग आहे. परंतु, सीबीआयने हा छापा कोणत्या कारणासाठी टाकला आहे, याला उत्तर देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.
या तस्करीची पाळेमुळे विदेशातही पसरलेली आहेत. विदेशात केटामाईन आणि ओएग्रा या औषधी पदार्थांवर बंदी असून ती केवळ भारतात डॉक्टरच्या दाखल्यावरूनच दिली जातात. या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात नशा येण्यासाठी केला जातो. त्यामुळे भारतातून विदेशात या औषधांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. डिओडरंट व परफ्युमच्या बाटल्या, टेडीबेअर अशा विविध वस्तूंमध्ये लपवून ही तस्करी टपाल खात्यामार्फत केली जाते.
केटामाईनचा वापर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी गुंगी देण्यासाठी केला जातो. हे औषध डॉक्टरच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोणालाही उपलब्ध करून देणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच क्षमतेपेक्षा या औषधांचा साठा फार्मसीत करून ठेवता येत नाही, अशी माहिती खास सूत्रांनी दिली.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नॉर्मन यात गुंतलेला असण्याची शक्यता कस्टम अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे खोलवर आणि बरीच दूरवर पसरलेली असल्याने तसेच कस्टम अधिकाऱ्यांच्या या छाप्यानंतर काही दिवसांतच सीबीआयने मुरगाव येथील कस्टम अधिकाऱ्यांवर छापा टाकल्याने याचा उलगडा होणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

No comments: