Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 December, 2009

'त्या' ट्रॉलरचे मालक रत्नागिरीला रवाना

नुकसानीचा आकडा साडेतीन कोटी
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): रत्नागिरी समुद्रकिनारी बुडालेल्या अवस्थेत आढळलेल्या गोव्यातील ट्रॉलर्सचे वृत्त धडकताच बेती येथील मांडवी मच्छीमार मार्केटिंग सोसायटीचे एक पथक रत्नागिरीला रवाना झाले आहे. या प्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर ट्रॉलर बेती येथील तुळशीदास सावंत यांच्या मालकीचा आहे, असेही समजल्याने ट्रॉलर मालकाचे बंधू व त्याच्याबरोबर अन्य दोन साथीदार रवाना झाल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मेनिनो आफोन्सो यांनी दिली.
कोकण व गोव्यातील समुद्रकिनाऱ्याला फयान वादळाने गेल्या ११ नोव्हेंबर रोजी बराच मोठा तडाखा दिला होता. या वादळात अनेक मच्छीमार बंधूंची मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. गोव्यालाही या वादळाचा मोठा फटका बसला व त्यात ६७ मच्छीमारबांधव बेपत्ता झाले होते. राज्य सरकारने तात्काळ या बेपत्ता मच्छीमारांना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. परंतु हा केवळ फार्स ठरला आहे. ही मदत देण्यासाठी मृत्यूचा दाखला हवा, असे कारण पुढे करून या बाबतीत सरकारकडून चालढकल केली जात आहे. प्रत्यक्षात या ६७ मच्छीमारांपैकी केवळ दोनच मच्छीमार गोमंतकीय असून उर्वरित सर्वजण बिगरगोमंतकीय कामगार आहेत. या मच्छीमारांना विमा कंपनीकडूनही मदत मिळण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अलीकडेच झालेल्या अधिवेशनात हा विषय मांडला होता. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी, असेही त्यांनी सरकारला सुचवले होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना होती. यापूर्वी कोकण किनारी भागात गोव्यातील ट्रॉलर्स किंवा मच्छीमारांचे मृतदेह सापडल्याची वृत्ते तिथून प्रसिद्ध झाली असली तरी त्याची दखल येथील मच्छीमार सोसायटींनीही घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे. मुळात ट्रॉलरवर कोण मच्छीमार होते याची माहिती ट्रॉलर मालकांना नव्हती व वादळात सापडलेल्या बहुतेक ट्रॉलरवरील सर्व मच्छीमार बेपत्ता असल्याने कुणाचाही थांगपत्ता कुणाला नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमारांच्या मृतदेहांवर हक्क सांगितल्यास त्यांचे कुटुंबीय मदतीसाठी रेटा लावणार या भीतीने ट्रॉलर मालकांनीही या बाबतीत पुढाकार घेतला नाही. यासाठी मृत मच्छीमारांबाबत कुणीच दावा केला नसल्याचीही खबर मिळाली आहे.
सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा दावा
फयान वादळाने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना दिलेल्या तडाख्यात झालेल्या नुकसानीचा आकडा सुमारे साडेतीन कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बेती व कुठबण जेटीवरील ट्रॉलरांना या वादळाचा फटका बसल्याने त्यांनी मच्छीमार खात्याकडे सादर केलेल्या अहवालानुसार नुकसानीचा आकडा साडेतीन कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी येथे काल सापडलेला ट्रॉलर हा बेती येथील तुळशीदास सावंत यांचा असल्याचे सांगितले जाते. खात्याकडे नुकसानीबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालात सर्वांत जास्त नुकसान हे तुळशीदास सावंत यांनाच झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यांनी ५१ लाख १५ हजार रुपये नुकसानी झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रत्नागिरीत सापडलेल्या या ट्रॉलरसह सहा मच्छीमारांचे मृतदेह सापडल्याचीही खबर असून त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

No comments: