Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 December, 2009

जिल्हा पंचायत निवडणूक ७ मार्चला?

राज्य निवडणूक आयोगाची शिफारस
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): मतदारसंघांची पुनर्रचना व जागांचे आरक्षण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाने दक्षिण व उत्तर जिल्हा पंचायतींच्या निवडणुका ७ मार्च २०१० रोजी घेण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. उभय जिल्हा पंचायतींच्या जागांच्या संख्येत मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नाही. राज्य निवडणूक आयुक्त पी. एम. बोरकर यांनी यापूर्वीच निवडणुकीचे वेळापत्रक अंतिम मंजुरीसाठी सरकारला पाठवून दिले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
विद्यमान जिल्हा पंचायतींचा कार्यकाल येत्या मार्च अखेरीस संपत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने नव्याने निवडणुका घेण्यासाठी कंबर कसली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोगाने निवडणुकांसाठी ७ मार्च ही अंदाजित तारीख निश्र्चित केलेली आहे, त्या बाबीचा तपशील सरकारला पाठवून दिलेला आहे.
मतदारसंघाची पुनर्रचना व राखीव जागांचे काम पूर्ण झालेले असून त्यामुळे उभय पंचायतींमधील जागांच्या संख्येत कोणताच बदल झालेला नाही. सध्या उत्तर गोवा जिल्हा पंचायतीत ३० तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत २० मतदारसंघ आहेत, ते तसेच ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय नेते व पक्षांना निष्ठा वाहिलेले विविध गट सक्रिय झाले असून निवडणुका लढविण्यासाठी पॅनल स्थापन करण्याच्या कामांना जोर आला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष क्लिओफासियू डायस हे आलेमाव बंधूंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली पॅनल बनविण्यास पुढाकार घेतलेला आहे. मात्र पक्षनेते पक्षाच्या झेंड्याखाली असे पॅनल स्थापण्यास राजी होतील किंवा गत निवडणुकांप्रमाणे व्यक्तिगत स्तरावर आपल्या उमेदवारांना उभे करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सासष्टीतील राजकीय गणिते वेगळ्याच प्रकारची असल्याने अशा पॅनलची स्थापना करावयाची झाल्यास त्या पक्षाला विविध गोष्टी व त्यांच्या परिणामांचा विचार करावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

No comments: