Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 26 December, 2009

रोझ गार्डनच्या प्राचार्यांची 'त्या' पालकाविरुद्ध तक्रार

संस्थेच्या अध्यक्षांचेही घूमजाव
पणजी, दि. २५(प्रतिनिधी): पर्वरी येथील रोझ गार्डन प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. चोडणकर यांच्याकडून कु. श्रेयश कळंगुटकर या विद्यार्थ्यावर छळाचे प्रकरण चिघळत चालले आहे. या प्रकरणी प्राचार्य श्री. चोडणकर यांनी आज सदर मुलाचे वडील शिवाजी कळंगुटकर यांच्याविरोधात खोटे आरोप करून बनावट तक्रार केल्याचा ठपका ठेवला आहे. यासंबंधी त्यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे कालच सांगितलेल्या धर्मराज भोसले यांनीही घूमजाव करून आपण राजीनामा दिलाच नाही, अशी भूमिका घेत प्राचार्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
या प्रकरणी प्राचार्य श्री. चोडणकर यांच्याविरोधात बालहक्क कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून घेतल्याने त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. येत्या २ जानेवारी २०१० रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. आता हे आरोप खोडून टाकण्यासाठी प्राचार्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून कु. श्रेयश याचे वडील शिवाजी कळंगुटकर यांनी संस्थेची बदनामी करण्यासाठी आपल्याविरोधात खोटी तक्रार दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, श्री. चोडणकर यांनी आपल्या तक्रारीत कु. श्रेयश या तिसरीतील मुलावर आक्षेपार्ह आरोप केले असून या तक्रारीवरून ते आणखी अधिक या प्रकरणांत गोवले जाण्याची शक्यता आहे. कु. श्रेयश याच्या कॅलेंडरवर मारलेल्या शेऱ्यांसाठी वापरलेली भाषा योग्य होती काय, असा सवाल केला असता या विद्यार्थ्याला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो समजून घेत नाही व यामुळेच ही परिस्थिती उद्भवली, असे लंगडे समर्थन सदर प्राचार्य करीत आहे. या तक्रारीत शिवाजी कळंगुटकर यांनी केलेले सगळे आरोप प्राचार्य श्री. चोडणकर यांनी फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष धर्मराज भोसले यांच्याशी काल प्रत्यक्ष मोबाईलवर संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा संस्थेच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आज मात्र त्यांनी अचानक घूमजाव केले व लेखी पत्र पाठवून आपण "तसे बोललोच नाही' अशी भूमिका घेतली आहे. संस्थेत कोणताही गैरप्रकार सुरू नाही असा दावा करून शिवाजी कळंगुटकर यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कु. श्रेयश याच्या वागणुकीबाबत १७ डिसेंबर रोजी शिक्षण खात्याला पत्र पाठवून जाणीव करून दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता ही तक्रार १५ रोजी दाखल झाल्यानंतर १७ रोजी शिक्षण खात्याला पत्र पाठवण्याची कृती कितपत ग्राह्य ठरते हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, त्यांनी पाठवलेल्या पत्रामागची सत्यता पडताळून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचे टाळले.

No comments: