Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 22 December, 2009

आरोग्यमंत्र्यांची चौकशी कुठे भरकटली!

राज्यातील किनारी भागांत मोठ्या प्रमाणात 'केटामाईन' या गुंगीच्या औषधांची अनधिकृत विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळूनही त्यांनी सुरू केलेली चौकशी थंड का पडली, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात या खात्याने उत्तर गोव्यातील पाच औषधालयांवर छापे टाकून मोठा साठा जप्त केला होता. कळंगुट येथील "लाइफ केअर मेडी सेंटर' औषधालयाचा परवाना स्थगित ठेवून अन्य औषधालयांची चौकशीही सुरू होती. खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या बाबतीत गंभीर दखल घेऊनही या अनधिकृत व्यवहाराला पर्दाफाश करण्यात हे खाते सपशेल अपयशी ठरल्याचे या प्रकरणावरून उघड झाले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या १० ऑगस्ट रोजी पणजी येथे भर पत्रकार परिषदेत "केटामाईन' प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. या औषधांचा वापर अमलीपदार्थ सेवनाप्रमाणे गुंगी येण्यासाठी केला जातो. त्याचे विदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळेच राज्यातील किनारी भागांत विविध औषधालयांकडून उघडपणे त्याची विक्री होत असल्याचेही आढळून आले होते. दरम्यान, या भागातील अनेक विद्यार्थी या औषधांना बळी पडत असल्याने अनेक पालकांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली होती. हे औषध शीतपेयाबरोबर घेतले जाते व त्यामुळे गुंगी येते. या भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्ट्यांतही या औषधांचा सर्रासपणे वापर होतो, असेही आरोग्यमंत्री म्हणाले होते.
विशेष करून कळंगुट, कांदोळी, शिवोली, साळगाव आदी भागांत औषधालयांकडून या औषधांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. "साजरो मेडिकल स्टोअर्स', "वॉलसन ऍण्ड वॉलसन मेडिकल्स', "श्री शांतादुर्गा मेडिकल स्टोअर्स' आदींवर छापे टाकून प्रथम दर्शनी त्यांची चौकशी सुरू केली होती. दरम्यान, या एकूण प्रकरणात एक बडी टोळीच कार्यरत असल्याचे सांगून त्या दृष्टीने चौकशी सुरू असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले होते. दरम्यान, नॉर्मन आझावेदो याच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून २००४ साली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याची सुनावणी न्यायालयात सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली होती. परवाना नसताना या औषधांची विक्री करणाऱ्या सर्व औषधालयांवर कठोर कारवाई करून प्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाईल, अशी घोषणा होऊनही गेले चार महिने खात्याला यामागील टोळीचा पर्दाफाश करता आला नाही, याचा नेमका अर्थ काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

No comments: