Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 June, 2009

आणखी पर्यटकच नको, मोपाही नको - चर्चिल

द्रुतगती महामार्गला पर्यायी प्रस्ताव

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - गोव्यात सध्याच्याच परिस्थितीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे त्यामुळे ही संख्या आणखीन वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र विरोध केला आहे. पर्यटकांची संख्या आणखीन वाढवायची गरज नाही, त्यामुळे गोव्याला अतिरिक्त मोपा विमानतळाचीही गरज नाही, असा दावा करून त्यांनी पुन्हा एकदा मोपा विरोधाचेही टुणटुणे वाजवले.
आज पर्वरी येथे आपल्या दालनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. गोव्यात पर्यटन उद्योग फोफावतो आहे हे खरे जरी असले तरी त्याचा लाभ मात्र गोमंतकीयांना फारच कमी होतो, असे ते म्हणाले. वाढत्या पर्यटकांमुळे येथे निर्माण होणाऱ्या विविध समस्या पाहिल्या तर राज्याच्या भवितव्याबाबत चिंता वाटते, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या दाबोळी विमानतळाकडून जेवढ्या पर्यटकांची सोय होते तेवढी बस्स झाली. मोपा विमानतळ बांधून आणखीन पर्यटकांना गोव्यात येण्याची सोय अजिबात नको, असे विधानही त्यांनी यावेळी केले. सध्या गोव्याला भेट देत असलेल्या पर्यटकांमुळेच एवढा ताण पडतो तर भविष्यात ही संख्या वाढली तर गोव्याचे काय होईल, असे सांगून त्यांनी आपल्या या विधानाचे समर्थनही केले.
चौपदरी महामार्गासाठी नवा प्रस्ताव
केंद्र सरकारने तयार केलेल्या द्रुतगती महामार्गाच्या प्रस्तावामुळे अनेकांना स्थलांतरित करण्याची वेळ येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यायी प्रस्ताव तयार केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार पत्रादेवी ते पोळे रस्त्याचे चौपदरीकरण व काही ठिकाणी सहापदरीकरण करण्यात येणार असून त्यात केवळ ३० ते ४० बांधकामे हटवावी लागणार आहेत, अशी माहिती चर्चिल आलेमाव यांनी दिली. येत्या १५ दिवसांत आपण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह दिल्लीला जाणार असून त्यावेळी हा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. हा प्रकल्प "बूट' पद्धतीवर राबवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गाचे काम हे रस्ता वाहतूक व महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाते परंतु गोव्याच्या हिताच्या दृष्टीने हा प्रस्ताव खास स्थानिक सा.बां.खाते अभियंत्यांनी तयार केल्याचेही ते म्हणाले. या महामार्गाबाबत विविध ठिकाणी बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते,असे सांगून केंद्र सरकारचा प्रस्ताव लागू केल्यास गोव्यात क्रांती होईल,असा टोलाही त्यांनी हाणला.

No comments: