Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 June, 2009

मुंबई हल्ल्यामागील सूत्रधार हाफिज सईदची निर्दोष मुक्तता

लाहोर, दि. २ - मागील वर्षी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार तसेच जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदला लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्याच्यासोबत त्याचा साथीदार नझीर अहमदलाही सोडण्यात आले आहे. जगभरातून दबाव आल्यानंतर पाकिस्तानने आपल्या देशातील काही संशयितांना अटक केली होती. मागील वर्षाच्या १२ डिसेंबरपासून सईदला त्याच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
पाकिस्तान सरकारने सईदविरुद्ध दिलेले पुरावे अपुरे होते आणि त्यातून मुंबई हल्ल्यामागे सईदचा हात होता, हे स्पष्ट होत नाही, असे म्हणत लाहोर उच्च न्यायालयाने सईद व त्याचा सहकारी नझीरला ताबडतोब मुक्त करण्याचे आदेश दिले. सईदची कैद ही राज्यघटना व देशाच्या कायद्याच्या चौक टीत बसत नसल्याचेही न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटल्याचे सईदचे वकील ए. के. डोगर यांनी सांगितले. दरम्यान, सईदच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतल्याचे ताजे वृत्त आहे.
लाहोर उच्च न्यायालयाच्या तीन जणांच्या खंडपीठाने हाफिज सईदचे वकील डोगर यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. सईदविरोधात कुठलेही ठोस पुरावे पाकिस्तान सरकारने दिलेले नाहीत तसेच भारताकडूनही काही ठोस माहिती आलेली नाही. त्यामुळे सईद व नझीर यांना बंदिवासात ठेवणे गैर आहे. त्यांना तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी डोगर यांनी न्यायालयासमोर केली होती.
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा एक भाग म्हणूनच "जमात-उद-दावा' ही संघटना काम करत होती. मुंबईवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रने या संघटनेवर बंदी घातली होती. संयुक्त राष्ट्रच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेही जमात-उद-दावाच्या नेत्यांची धरपकड केली होती व जमातचा प्रमुख सईदला नजरकैदेत ठेवले होते.
हाफिज सईदची सुटका दुर्दैवी : कृष्णा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार हाफिज सईद याच्या सुटकेवर भारताने आज तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत म्हटले आहे की, सईदची सुटका ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. या निकालामुळे पाकिस्तानने पुन्हा आपले रंग दाखवावयास सुरुवात केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, यामुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जी चौकशी पाकिस्तानने सुरू केली आहे, त्यावरच आता आम्हाला शंका येऊ लागली आहे. दहशतवाद्यांविरोधातही पाकिस्तानने जी कारवाई सुरू केली आहे त्यावरही कृष्णा यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे.
याआधी सईदच्या सुटकेवर गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, याचाच अर्थ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याकडे पाकिस्तान अद्यापही गांभीर्याने बघत नाही. हाफिज सईद याला न्यायालयाने नजरकैदेतून मुक्त केले असले तरी त्याचा मुंबई हल्ल्यावरील चौकशीवर कोणताही परिणाम होणार नाही. चौकशी सुरूच राहील. या सर्व घटनाक्रमाकडे बघता पाकिस्तान दहशतवादाप्रति अद्यापही गंभीर नाही, दिलेल्या वचनांचा पाकिस्तान भंग करीत आहे, हेच यावरून दिसून येते.

No comments: