Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 May, 2009

लाहोरमध्ये अतिरेकी हल्ल्यात ४५ ठार, शेकडो जखमी

तालिबानचा हात असल्याचा संशय

लाहोर, दि. २७ ः पाकिस्तानात तालिबान्यांची हिंमत वाढतच असून, आज त्यांनी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या लाहोर येथील मुख्यालयाला लक्ष्य बनवून भीषण आत्मघाती हल्ला केला. त्यात ४५ लोक ठार झाले असून शेकडो जखमी आहेत. या परिसरात उच्च न्यायालयाची इमारतही असून तेथे मुंबई हल्लाप्रकरणी अटकेत असणाऱ्या अतिरेक्याची सुनावणी होणार होती. त्याला सोडविण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यताही पाकिस्तानी पोलिसांद्वारे वर्तविली जात आहे. भारतासह जगभरातील सर्व देशांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करावा, अशी गरज प्रतिपादन केली आहे.
लाहोर शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात गजबजलेल्या मॉल रोडजवळ हा स्फोट झाला. आयएसआयच्या इमारतीजवळ उभारण्यात आलेल्या अडथळ्यांवर स्फोटकांनी भरलेला एक ट्रक आदळवून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. यावेळी झालेल्या स्फोटामुळे जवळच असलेली पोलिस मुख्यालयाची इमारत जमीनदोस्त झाली. या ढिगाऱ्याखाली अनेक पोलिस कर्मचारी अडकून पडले असून, आजूबाजूच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
अतिरेक्यांनी आणलेल्या गाडीत सुमारे १०० किलो स्फोटके असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुळात, अतिरेक्यांना ही गाडी उच्च न्यायालय किंवा आयएसआयचे मुख्यालय येथे धडकवायची होती. पण, त्यापूर्वीच अडथळ्यांवर ती आदळली असावी, असा अंदाज आहे. बॉम्बस्फोटानंतर पांढऱ्या धुराचे लोळ उठले आणि लगेचच गोळीबाराचा आवाज झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी स्फोटापूर्वी आणि नंतरही गोळीबार झाल्याचे सांगितले. मात्र, तो गोळीबार नेमका कोणी केला हे समजू शकलेले नाही. अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.
पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील खेळाडूंवर गेल्या ३ मार्चला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील काही संशयितांना अटक करण्यात आली होती. आज हल्ला झाला तेव्हा ते आयएसआयच्या कार्यालयात होते. जवळच लाहोर उच्च न्यायालयाची इमारत असून मुंबईतील अतिरेकी हल्ल्यासंदर्भात ताब्यात घेण्यात आलेल्या जमात-उद्-दावा या संघटनेचा प्रमुख हफीज सईद याला आजच न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
या हल्ल्यात किमान १८ पोलिस कर्मचारी ठार झाल्याचे अधिकृत वृत्त आहे. मृतांचा एकूण आकडा कमी सांगितला जात असला तरी तो बराच मोठा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चौकशीचे आदेश
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या हल्लाप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी झळकविले आहे.
पाकिस्तानी सरकारने स्वात, दिर आणि वायव्य प्रांतात जी लष्करी कारवाई सुरू केली आहे, त्याचा परिणाम म्हणून तालिबानने हा स्फोट घडवून आणला असावा, अशी शक्यता पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी व्यक्त केली आहे. अतिरेक्यांनी पाकी प्रशासनाचे मनोबल खच्ची करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देशविरोधी शक्तींना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही मलिक यांनी दिला.
लाहोर शहरात गेल्या दोन वर्षात अनेक बॉम्बहल्ले झाले आहेत. गेल्या ३० मार्चला अतिरेक्यांनी लाहोरपासून जवळच असणाऱ्या मनवाना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. त्यात १० जण मृत्यूमुखी पडले होते. त्यापूर्वी ३ मार्चला श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर हल्ला झाला होता. त्यात सहा पोलिसांसह आठ जण ठार झाले होते तर काही क्रिकेटपटू जखमी झाले होते.
भारतातर्फे निषेध
लाहोरमधील भीषण आत्मघाती स्फोटाची भारताने निंदा केली असून, अशा प्रत्येक संकटाच्या वेळी भारत पाकिस्तानी प्रशासनाच्या सोबत असेल, अशी भावना नवे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.एम.कृष्णा यांनी व्यक्त केली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना कृष्णा म्हणाले की, लाहोरमध्ये स्फोटानंतर उद्भवलेल्या स्थितीवर भारताचे बारीक लक्ष आहे. प्रत्येक घडामोडीकडे भारत लक्ष ठेवून आहे. या भीषण हल्ल्याचे आम्हाला तीव्र दु:ख आहे. यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो आणि आगामी काळात दहशतवादाचा पूर्ण नायनाट होवो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मुंबई हल्ल्यातील अतिरेक्याला सोडविणे हे लक्ष्य?
लाहोरच्या गजबजलेल्या मॉल रोड परिसरात झालेल्या हल्ल्यामागे जमात-उद्-दावा या संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेला जमातचा प्रमुख हाफिज सईद याला सोडविण्यासाठी संघटनेने हा हल्ला केला असावा. लाहोर उच्च न्यायालयाजवळ सकाळी सव्वादहाच्या सुमारास हे भीषण स्फोट झाले. त्याच दरम्यान हाफिज सईद याची ११ वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यापूर्वीच स्फोट घडवून सईद याला सोडविण्याचा कट अतिरेक्यांनी रचला होता, असे पाकिस्तानी पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्फोटके, बुलेटप्रुफ जॅकेटही सापडल्याचे समजते.

No comments: