Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 May, 2009

बस्स झाली, सरकारकडून कलाकारांची उपेक्षा

पुरस्कार देऊन जबाबदारी झटकू नका - किशोरी आमोणकर

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) ः परदेशात जाऊन पैसे कमावण्याची पाळी भारतीय कलाकारांवर यावी ही लाजिरवाणी बाब आहे. मायदेशी त्यांना सरकारी मदत मिळत नाही म्हणून ते परदेशात जातात. सरकारने "भारतरत्न' किंवा "पद्मभूषण' पुरस्कार दिले म्हणून कलाकाराच्या विवंचना मिटल्या असे होत नाही, असे सडेतोड मत आज गान सरस्वती पद्मभूषण किशोरी आमोणकर यांनी व्यक्त केले. उद्या दि. ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कला अकादमीत होणाऱ्या "ऍन इव्हनिंग वुईथ मास्टर्स' या कार्यक्रमाच्या निमित्त "एसएनके'या कार्यक्रम आयोजन संस्थेने आयोजिलेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
पद्मभूषण पुरस्कारप्राप्त कलाकारांना विमानतळावरही सूट नाही. मात्र चित्रपटातील कलाकारांना थेट जाण्यासाठी वेगळा मार्ग उपलब्ध करून दिला जातो. प्रतिभावंत कलाकारांनी भारताचे नाव केले आहे की, या फिल्मी तारकांनी, असा मूलभूत प्रश्नही यावेळी किशोरी आमोणकर यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांच्याबरोबर कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराजा कॅसिनोचे जॉन स्नोबॉल, सिदाद द गोवा चे केविन रॉड्रिगीस, बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक राजीव फणसे व "एसएनके'च्या सुमेधा देसाई उपस्थित होत्या.
किशोरी आमोणकर म्हणाल्या की, संगीत हे युद्धासाठी किंवा स्पर्धेसाठी नाही. सध्या जे चालले आहे ते आत्मा रिझवरणारे संगीत नसून ते केवळ मनोरंजनाचे साधन बनले आहे. या स्पर्धा म्हणजे अळवावरचे पाणी आहे. गंगाजलाचा एक छोटा चमू देव्हाऱ्यात ठेवून आमच्याकडे गंगा आहे, असे म्हणण्याचा हा प्रकार. ज्यांना सागराची अथांगता अनुभवायची आहे त्यांनी शास्त्रीय संगीताकडे वळावे. प्रामुख्याने नवोदित गायकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी.
साधना म्हणजे रियाज नाही. मी माझे गाणे बदलले. मात्र या बदलाची चाहून घेण्यासाठी एकही गोमंतकीय विद्यार्थी पुढे आला नाही याची मला खंत वाटते. योग्य पद्धतीने शिकवले जाता नाही, म्हणून एकही कलाकार मोठा होत नाही. संगीताचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी याचा विचार करावा. अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी परदेशात अकादमी सुरू केली आहे. तथापि, विदेशात कोणी उत्तम प्रकारे शास्त्रीय संगीत गातो, असे दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.
संगीतात काळानुसार बदल होणार. मात्र ज्या हेतूने भारतीय संगीत जन्माला आले आहे, तेच बदलले तर परंपरा राहणार नाही. भारतीय शास्त्र, कला जपण्यासाठी याचा विचार झाला पाहिजे. शब्द हा विश्वव्यापी नसून ध्वनी विश्वव्यापी आहे. राग हा शब्दांचा नसतो तर, तो स्वरांचा होतो. मात्र गेल्या काही काळात स्वरांना शब्दांची गुलामगिरी पत्करावी लागली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
"ऍन इव्हनिंग वुईथ मास्टर्स' या कार्यक्रमाची मूळ संकल्पनाच किशोरी आमोणकर यांना नजरेसमोर ठेवून उदयास आली. चांगले गाणे गोमंतकीयांसमोर ठेवण्याचा विचार होता. पूर्वीचे कार्यक्रम जलसारुपी असायचे. त्यावेळी मैफल म्हणजे काय, हे लक्षात यायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोव्यात दीड तासाचे एक सत्र अशा पद्धतीने कलाकार गात असल्याने मैफलीची परंपरा मोडीत निघाली आहे. म्हणून ही संकल्पना पुढे ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सौ. देसाई म्हणाल्या.
स्थानिक संस्कृतीला, संगीताला प्रोत्साहन देणे ही आमची आवड असून ती आमची जबाबदारीही आहे, असे महाराजा कॅसिनोचे जॉन स्नोबॉल म्हणाले.

No comments: