Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 28 May, 2009

आणखी दोन युवतींच्या खुनाची महानंदची कबुली

फोंडा, दि.२७ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने आणखी दोन युवतींच्या खुनांची कबुली दिली असून महानंद नाईकने केलेल्या खुनांची संख्या आता १२ झाली आहे. केरी फोंडा येथील कु. भागी सतरकर हिचा २००५ सालात आणि दवर्ली मडगाव येथील दीपाली जोतकर हिचा २००७ सालात खून केल्याची कबुली संशयित महानंद नाईक याने दिली आहे.
नाळ्ळे केरी येथील कु. भागी सतरकर ही २००५ सालापासून बेपत्ता आहे. कु.भागी हिचा बोरी येथे डोंगराळ भागात खून केल्याची कबुली महानंद याने दिली असून बोरी येथे "त्या' काळात एक अनोळखी मृतदेह सापडला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कु. भागी सतरकर ही घरातून जाताना सोन्याचे दागिने घेऊन गेलेली होती. त्यामुळे ह्या बेपत्ता प्रकरणामध्ये महानंद याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कु. भागी बेपत्ता प्रकरणी पोलीस स्टेशनवर तक्रार करण्यात आलेली नव्हती. कु. भागी हिची विवाहित बहीण निर्मला हिने फोंडा पोलिसांशी संपर्क साधून यासंबंधीची माहिती दिली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. कु. भागी घरातून जाताना दोन सोन्याची काकणे, एक सोन्याचा हार, सोनसाखळी, रिंग आदी वस्तू घेऊन गेली होती. कु. भागी हिच्या वडिलांचे बेपत्ता होण्यापूर्वी निधन झाले होते. तर आईचे बेपत्ता झाल्यानंतर पाच सहा महिन्यांनी निधन झाले. तिला भाऊ व पाच बहिणी आहेत. कु. भागी ही फोंड्यात ये-जा करीत होती. वरचा बाजार फोंडा येथे महानंद नाईक याचा वावर असल्याने त्याच्या संपर्कात आली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मडगाव येथील कु. दीपाली जोतकर हिचा २००७ सालात फातर्पे कुंक्कळी भागात खून करून मृतदेह रेल्वे बोगद्याच्या बाजूला टाकला होता, अशी कबुली महानंद नाईक याने दिली आहे. २००७ सालात कुंकळ्ळी पोलिसांनी एक अनोळखी मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
श्री. जोतकर यांच्या घराच्या विस्तारीत भागाच्या बांधकामाचा ठेका महानंद नाईक याने घेतला होता. यावेळी महानंद नाईक हिची दीपाली हिच्याशी ओळख झाली. महानंद याला फोंडा पोलिसांनी युवतीच्या खून प्रकरणी अटक केल्यानंतर दीपालीच्या आईने फोंडा पोलिस स्टेशनवर येऊन संशयित महानंद नाईक याला ओळखले आणि त्याच्यावर एक थप्पड सुध्दा मारलेले आहे. दीपाली घरातून जाताना सुमारे रोख ८० हजार रुपये तसेच सत्तर - एैशी हजार रुपयांचे दागिने घेऊन गेली होती. या प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी, दीपक पेडणेकर व इतर तपास करीत आहेत. कु. भागी व कु. दीपाली यांच्या खुनासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

No comments: