Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 May, 2009

जामीन अर्ज फेटाळताच निलंबित पोलिसास अटक

पेडणे वेश्याव्यवसाय प्रकरण

अनेकांचे धाबे दणाणले..

पेडणे, दि.२८ (प्रतिनिधी) - पेडण्यातील कथित वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी अलीकडेच निलंबित केलेला पोलिस शिपाई राजेश सावंत याने पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज आज फेटाळण्यात आल्यावर पेडणे पोलिसांनी त्याला लगेचच भारतीय दंड संहितेच्या ३८४,३६६ व ३७६ कलमाखाली अटक केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
राजेश सावंतच्या अटकेमुळे या प्रकरणातील टोळीचा छडा पोलिस कोणत्या प्रकारे लावतात याकडेच आता लोकांचे लक्ष लागले आहे. खुद्द पोलिसच गुंतल्याचा संशय असलेल्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या या भागात सुरू आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार गेल्या ६ मे रोजी म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात अटक केलेल्या एका मुलीने राजेश सावंत याचे नाव घेतले होते.याबाबत उत्तर गोवा पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी सावंतला तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता.या प्रकारानंतर गेले दोन आठवडे राजेश सावंत हा बेपत्ता होता. याप्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने पणजीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावरील सुनावणी दोनदा पुढे ढकलल्यानंतर आज अखेर हा अर्ज फेटाळण्यात आला. तेव्हा तेथेच हजर असलेल्या राजेश सावंत याला तात्काळ पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले. बळजबरीने पैसे उकळणे,अपहरण करणे व बलात्कार अशा कलमाखाली त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पेडणे पोलिसांनी दिली.
धाबे दणाणले...
राजेश सावंत याच्या अटकेमुळे या प्रकरणी गुंतल्याची शक्यता असलेल्या अनेकांचे सध्या धाबे दणाणले आहेत.याप्रकरणी या भागातील एक टोळीच कार्यरत आहे व यात अनेक पोलिसही सामील असल्याची जोरदार चर्चा या भागांत सुरू आहे.काहीही काम न करता मोठमोठी वाहने व बंगले उभारलेल्या या लोकांचा हा काळा धंदा उघड व्हायलाच हवा,असा सुर या भागातील लोकांकडून व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी काही स्थानिक पंचसदस्य तथा सरपंचही सहभागी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. केवळ वेश्या व्यवसायच नव्हे तर या भागातील लोकांकडून बेकायदेशीर कामांसाठी हप्ते गोळा करणे,जुगारी अड्डेवाल्यांकडून हप्ते वसूल करणे आदी प्रकारही या टोळीकडून सुरू होते,अशीही माहिती प्राप्त झाली आहे.पेडणे पोलिस स्थानकावरच शिपाई म्हणून सेवा बजावत असलेल्या राजेश सावंत याला आता खुद्द पेडणे पोलिस स्थानकाच्या कोठडीत ठेवण्याची वेळ पेडणे पोलिसांवर ओढवल्याने पोलिसांच्या प्रतिष्ठेला हादरा बसला आहे.

No comments: