Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 May, 2009

म्हार्दोळच्या डोंगरात "तिचा' गळा आवळला

महानंदने दिली पंधराव्या खुनाची कबुली

फोंडा, दि. २९ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने पंधराव्या खुनाची कबुली दिली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी आज (दि.२९) दिली आहे.
कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगराळ भागात डिसेंबर २००५ मध्ये एका युवतीचा आपण खून केलेला आहे. त्या युवतीचे नाव आपणाला आता आठवत नाही, अशी माहिती क्रूरकर्मा महानंद नाईक याने दिली आहे. या माहितीची पोलिसांनी शहानिशी केली असता ३० डिसेंबर २००५ मध्ये कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगरावर एका युवतीचा मृतदेह सापडला होता.
खून करण्यात आलेली युवतीचे हातुर्ली मठाजवळ घर आहे, असे तिने आपणाला सांगितले होते. सदर युवती मडगाव येथून तयार कपडे आणून विकण्याचा व्यवसाय करीत होती, असेही महानंद याने पोलिसांना सांगितले आहे. सदर युवती फोंडा भागात कपडे विकण्याचे काम करीत असताना तिच्याशी आपला परिचय झाला. महानंदने तिचा आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून तिला कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगरावर नेऊन तिचा गळा आवळून खून केला.
सदर युवतींच्या अंगावर क्रिम रंगाचा चुडीदार सापडलेला आहे.
महानंदाच्या जबानीप्रमाणे चौकशी केली असता "त्या' ठिकाणी कुजलेला मृतदेह पोलिसांना २००५ सालात आढळून आलेला आहे. मृतदेह सापडलेल्या युवतीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे दरम्यान आहे. सदर मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर मृत्यू प्रकरणाची फाईलबंद केली. आता पुन्हा एकदा सदर फाईल उघडून युवतीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महानंद याने खून केलेल्या पंधराव्या युवतीचे नाव अद्याप उघड झालेले नाही. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तपास काम हाती घेण्यात आले असून खून करण्यात आलेल्या युवतीच्या घराचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल.पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान , रिवण येथील कु. निर्मला आमोलकर खून प्रकरणी महानंद नाईक याची कसून चौकशी करण्यात आली. क्रूरकर्मा महानंद नाईक याला आज सकाळी वेर्णा येथे घटनास्थळी नेण्यात आला होता. क्रूरकर्मा महानंद नाईक प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालल्याने ह्या खुनाची मालिका कधी खंडित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने हाताळून महानंद याला कठोर शिक्षा देऊन खून करण्यात आलेल्या युवतींच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी लोकांची मागणी आहे.

No comments: