Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 May, 2009

निर्मला, भागूचा खुनी महानंदच!

पत्नीचाही सहभाग
१४ खुनांची कबुली
संख्या वाढत चालली
राय येथील खुनांतही
महानंदचा हात?


फोंडा, दि.२८ (प्रतिनिधी) - रिवण येथील निर्मला रामू आमोणकर (३२) हिचा २००८ सालात आणि सातपाल साकोर्डा तांबडीसुर्ला येथील कु. भागू उपसकर (३५) हिचा २००७ सालात खून केल्याची कबुली क्रूरकर्मा महानंद नाईक याने आज (दि. २८ रोजी) दिली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी दिली आहे. सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने केलेल्या युवतींच्या खुनाची संख्या आता १४ झाली असून ही संख्या वाढतच जात आहे.
निर्मला आमोणकर हिचा खून २००८ सालात वेर्णा पोलिस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आला होता. निर्मला हिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वेर्णा पोलिसांना सापडलेला असून त्या मृतदेहाची ओळख सुद्धा त्याच वेळी पटविण्यात आलेली आहे. घरातून जाताना ती सोन्याचे दागिने घेऊन गेली होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. निर्मला लग्नाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, निर्मला लग्नाला गेलेली नाही, असे समजताच नातेवाइकांनी केपे पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चार दिवसांनी वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत तिचा मृतदेह आढळून आला होता. निर्मला हिच्या कुटुंबीयांकडून महानंदवर संशय घेतला जात होता. निर्मला हिला आपले एक दुकान असल्याची माहिती त्याने दिली होती. निर्मला बेपत्ता झाल्यानंतर निर्मलाच्या भावाने त्यांना दाखविण्यात आलेल्या दुकानावर जाऊन चौकशी केली असता सदर दुकाने दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले होते.
सातपाल साकोर्डा तांबडीसुर्ला येथील भागू उपसकर हिचा २००७ सालात खून केल्याचे महानंद नाईक याने उघड केले आहे. भागू बेपत्ता झाल्याची माहिती फोंडा पोलिसांना २७ मे ०९ रोजी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून सत्य उजेडात आणले आहे. भागू हिचा केपे येथे एका शेत बागायतीच्या बाजूला खून करण्यात आला होता. भागू हिचा खून केलेली जागा महानंद याने पोलिसांना नकाशा काढून दाखविली असून तेथूनच एका अनोळखी युवतीचा मृतदेह केपे पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. भागू ही फोंडा येथे घरकामाला होती, त्याच भागात क्रूरकर्मा महानंद नाईक वावरत होता. भागूला सुद्धा त्याने आपल्या जाळ्यात ओढले होते, घरातून जाताना ती सोन्याचे दागिने घेऊन गेली होती. यासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. भागू बेपत्ता प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केपे पोलिसांनी मयताची ओळख न पटल्याने अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून फाईल बंद केली होती, अशी माहिती मिळाली आहे.
सीरियल किलर महानंद नाईक याने खून केलेल्या युवतीची संख्या वाढत चालली असून केवळ महिनाभराच्या तपासाच्या काळात १४ खुनांची प्रकरणे उघड झाली आहेत. याचबरोबर एका युवतीवरील बलात्काराचे प्रकरण तसेच अन्य एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लुबाडण्याचे एक प्रकरणही उघड झाले आहे. क्रूरकर्मा महानंद नाईक खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीची योग्य पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. क्रूरकर्मा महानंद याने सुरुवातीला खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांपासून खरी माहिती जास्त काळ लपवून ठेवू शकला नाही. क्रूरकर्मा महानंद याने लग्नाचे आमिष दाखविल्याने गरीब कुटुंबातील युवती सुखी संसाराची स्वप्ने रंगवत घरातील सोने घेऊन क्रूरकर्मा महानंद नाईक याच्या समवेत जात होत्या.
क्रूरकर्मा महानंद नाईक याला एका चोरी प्रकरणात २००२ सालात फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी संशयिताच्या भावांनी तक्रारदारावर दबाव आणून तक्रारीतून अंग काढून घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सदर प्रकरणातून महानंद सुटला होता. याच वेळी पोलिसांनी महानंद याची कसून चौकशी केली असत तर एवढे मोठे युवतींचे हत्याकांड घडले नसते. मडकई येथील वासंती गावडे बेपत्ता प्रकरणाच्या वेळी सुद्धा पोलिसांनी महानंदची योग्य चौकशी केली नाही, अशी चर्चा लोकांत सुरू आहे. पोलिसांच्या योग्य तपासाच्या अभावामुळे क्रूरकर्मा महानंद निर्ढावला. आता या प्रकरणातून क्रूरकर्मा महानंद सुटू नये म्हणून कसून तपास करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या युवतींचे गळे आवळून महानंद त्यांची शोकांतिका करून टाकत होता. क्रूरकर्मा महानंद गरीब घराण्यातील मुलींची शोधून निवड करायचा, असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, लक्षी आमोणकर, तुकाराम चव्हाण, निखिल पालेकर, संजय पाटील, सचिन लोकरे, सचिन पन्हाळकर, हेडकॉन्स्टेबल प्रताप परब तपास करीत आहेत.




दीपाली प्रकरणी गुन्हा नोंदीचे आदेश



मडगाव, दि.२८ (प्रतिनिधी): रुमडामळ दवर्ली येथून २००७ मध्ये बेपत्ता झालेल्या दीपाली जोतकर प्रकरणी सीरियल किलर महानंद नाईक विरुद्ध अपहरण व खुनाचा (कलम ३६४ व ३०२) गुन्हा नोंदविण्याचा आदेश आज दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी मायणा कुडतरी पोलिसांना दिला. तसेच दीपालीची बहीण पल्लवी हिच्या बेपत्ता प्रकरणी नव्याने तपास सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, राय येथे अशाच अवस्थेत सापडलेल्या तरुणीचा मृतदेह हासुद्धा खुनाचाच प्रकार असावा व त्यात महानंदचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महानंदला येथे आणल्यावर या प्रकरणाचाही उलगडा होईल अशी आशा पोलिस बाळगून आहेत.
महानंद याने परवा फोंडा पोलिसांना दीपाली प्रकरणी दिलेल्या जबानीवरून त्याने तिचा माड्डेमळ फातर्पा येथे खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या जबानीची त्या दिवसात त्या परिसरांत मिळालेल्या मानवी सांगाड्याच्या अहवालाशी सांगड घालून अधीक्षक डिसा यांनी हा आदेश दिला आहे.
जानेवारी २००७ मध्ये दीपालीचा अर्धनग्न अवस्थेतील सांगाडा मिळालेला असला तरी कपडे सोडल्यास ओळख पटविणारी दुसरी कोणतीच बाब नसल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद करून ते प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिले होते. एवढेच नव्हे तर पोलिसांनी नंतर काहीच ओळख मिळत नसल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंतीही केली होती असे आता उघड झाले आहे.
दीपाली घरातून रोख ८० हजार व लाखभराचे दागिने घेऊन गेली होती. तिने मित्राबरोबर जात असल्याची चिठ्ठी ठेवल्याने पोलिसांनीही त्यावेळी त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला नव्हता. कुंकळ्ळी पोलिसांनीही मिळालेल्या मृतदेहाचे कोडे सोडविण्याची तसदी घेतली नाही. एवढेच नव्हे तर मृतदेहाचा व्हिसेरा चिकित्सेसाठी पाठविल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा अहवाल कोठे आहे याबद्दल माहिती देण्याच्या मनःस्थितीत कोणीच नाही.
दुसरीकडे दीपाली जरी दवर्लीतून बेपत्ता झालेली असली तरी तिचा मृतदेह फातर्पा येथे सापडल्यामुळे या प्रकरणाचा तपास मायणा कुडतरी की कुंकळ्ळी पोलिसांनी करावा याबाबत निर्माण झालेला प्रश्न पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण मायणा कुडतरी पोलिसांकडे सुपूर्द करून सोडविला आहे.
महानंदला फोंडा पोलिसांकडून ताब्यात घेऊन येथे आणून या प्रकरणाचे कोडे सोडविले जाईल व तपास केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
दुसरीकडे दीपालीची बहीण पल्लवी हिच्या बेपत्ता होण्याशीही महानंदचाच हात असण्याची जी शक्यता "बायलांचो एकवट'च्या आवडा व्हिएगश यांनी व्यक्त केली आहे त्या प्रकरणी तपास करण्याची सूचना पोलिस अधीक्षकांनी मायणा कुडतरी पोलिसांना दिली आहे.

No comments: