Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 May, 2009

पंजाबात रेलगाड्या पेटवल्या

लष्कर, पोलिसांच्या गोळीबारात दोन ठार

जालंधर, चंडीगढ, दि. २५ - डेरा सचखंडच्या नेत्याची व्हिएन्नामधील गुरूद्वारात रविवारी हत्या करण्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या पंजाब बंद दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रेल्वे डबे आणि बसगाड्यांना आगी लावून आपला संताप प्रकट केला, तर लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे ठार झाले. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचा अनेक ठिकाणी संघर्ष झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही जिल्हे वगळता पंजाब बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
जालंधर, लुधियाना, फगवाडा आणि होशियारपूर या चार जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या चारही शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलकांनी या चार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरकारी आणि खाजगी संपत्तीची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. पोलिस ठघण्यांमध्ये ठेवलेल्या गाड्यांनाही त्यांनी आगी लावल्या. जालंधर जिल्ह्यातील लांब्रा गावात लष्कराने केलेल्या गोळीबारात एकजण तर जालंधर रेल्वे स्थानकाबाहेर हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणखी एक असे दोघे ठार झाले.
जालंधर, फगवाडा, होशियारपूर, नवांशहर, बांगा, लुधियाना आणि मोगा या जिल्ह्यात रेल्वे डब्यांना, बसगाड्यांना आणि अन्य वाहनांना आगी लावण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. दिल्ली-लाहोर ही बससेवा लुधियाना येथेच थांबविण्यात आली आहे. अंबालात बसगाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले तर अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग तीन तासांसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांनी बळाचा वापर करून हा मार्ग मोकळा केला. आजच्या पंजाब बंदचे आवाहन शिरोमणी अकाली दलानेही केले होते. जनतेने राज्यात शांतता आणि सदभाव कायम राखावा असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केले आहे.
लांबा येथे आंदोलनकर्त्यांनी पोलिस महानिरीक्षक संजीव कालरा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला चढविला आणि पोलिस अधीक्षक सरबजीतसिंग यांच्या वाहनाला आग लावली. कालरा यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबाराच्या २० फैरी झाडून जमावाला पांगविले.
जालंधर येथे जम्मू - कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेसच्या सहा डब्यांना आगी लावण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी आधी सर्व प्रवाशांना गाडी रिकामी करण्यास सांगितले आणि नंतर डब्यांना आग लावली. फगवाडा येथे सोनेपूर-जम्मू एक्सप्रेसच्या चालकाच्या डोक्यावर तलवार ठेवून त्याला इंजिनबाहेर खेचण्यात आले आणि नंतर डब्यांना आगी लावण्यात आल्या. गाडीचे इंजिन वेळीच वेगळे केल्याने निदान इंजिन तरी वाचले.
फगवाडा जिल्ह्यात संतप्त जमावाने अनेक ठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर अनेक ठिकाणी दगडफेक केली. जवानांनी लाठीमार करून त्यांना पिटाळले. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-अंबाला, जालंधर-जम्मू आणि जालंधर -चंडीगढ या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांवर ट्रकांना आगी लावून तसेच अडथळे निर्माण केल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी येथेही आंदोलकांवर लाठीमार केला. पंजाबात पतियाळा, लुधियाना, जालंधर, अमृतसर, होशियारपूर, फगवाडा तर हरयाणातील अंबाला मिळून २० बसगाड्या जाळण्यात आल्या. फगवाडा येथे स्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.
संपूर्ण जालंधर शहरात संचारबंदी असल्यामुळे शासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने आणि शिक्षणसंस्था बंद होत्या. लष्कर आणि पोलिसांनी या शहरात फ्लॅग मार्च केला. जमावाने मकसूदन पोलिस ठाण्यावर हल्ला चढवून ठाण्यात ठेवलेल्या वाहनांना आगी लावल्या. पोलिसांनी यावेळी जमावावर जबर लाठीहल्ला करून त्यांना पांगविले आणि काही लोकांना अटक केली. जमावाने जालंधरमधील राम नगर रेल्वे क्रॉसिंगसमोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे रेल्वेगाड्या आधीच्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी पत्रकार आणि वृत्तछायाचित्रकारांवरही हल्ले केले. नूरमहल या गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. येथे २८ मे रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.


शांतता आणि सद्भाव
कायम राखा : पंतप्रधान


नवी दिल्ली, दि. २५ - व्हिएन्ना येथे डेरा सचखंडच्या नेत्याच्या हत्येवरून पंजाबात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अतिशय दु:ख व्यक्त केले असून, जनतेने शांतता आणि सद्भाव कायम राखावा, असे आवाहन केले आहे.
व्हिएन्नात जे काही घडले, त्यामुळे जनतेचा संताप अनावर होऊ शकतो, पण समाजाच्या सर्व समुदायातील लोकांनी शांतता आणि सद्भाव कायम राखणे हेही महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शीख धर्म आम्हाला संयम आणि एकोप्याची शिकवण देतो. आमच्या सर्वच गुरूंनी समानतेची मूल्ये, बंधुभाव आणि सद्भावाची शिकवण दिली आहे आणि आपण त्याचे पालन केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
ज्या भागात संचारबंदी लावली गेली आहे, त्या भागातील जनतेने आपापल्या घरीच रहावे आणि सुरक्षा दलांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यास मदत करावी, हिंसाचाराला कोणताही थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments: