Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 May, 2009

अंजुणे परिसरात सापडले वाघांच्या पायाचे ठसे

कथित हत्याप्रकरणाला नवे वळण

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी) - वन खात्याच्या विशेष पथकाने केलेल्या पाहणीत अंजुणे धरण परिसरात एक वाघीण व तिच्या बछड्याच्या पायाचे स्पष्ट ठसे सापडल्याने या परिसरात वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्य वनपाल डॉ.शशीकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या ताज्या घडामोडीमुळे केरी सत्तरी येथे घडलेल्या तथाकथित पट्टेरी वाघाच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण प्राप्त झाले असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वन खात्याने कंबर कसली आहे.
केरी सत्तरी येथे पट्टेरी वाघाची हत्या झाल्याचा प्रकार पर्यावरणप्रेमी प्रा.राजेंद्र केरकर यांनी उघडकीस आणला होता. या संदर्भात त्यांनी हत्या झालेल्या वाघाचे मोबाईलवरील एक छायाचित्रही वन खात्याला दिले होते. या परिसरात वाघाचे अस्तित्व नसल्याने प्रा.केरकर यांच्या या दाव्याला वन खात्याकडून विशेष महत्त्व देण्यात आले नाही. दरम्यान, प्रा.केरकर हे स्वतः केरी गावात राहतात. या वाघाच्या हत्या प्रकरणात केरी गावातीलच काही लोक सामील असल्याने या लोकांचा रोष सध्या त्यांना पत्करावा लागत आहे. वन खात्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली असून मृत वाघाचे कोणतेही अवशेष मिळाले नाहीत,अशी माहिती शशीकुमार यांनी दिली. दरम्यान,प्रा.केरकर यांना वन खात्याकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबतही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.एकतर यापूर्वी येथील पर्यावरणप्रेमींकडून या परिसरात वाघाच्या अस्तित्वाबाबतची माहिती दिली होती पण वन खाते याबाबत काहीच करू शकले नाहीत. आता वन खात्याच्या विशेष पथकाने केलेल्या पाहणीत अंजूणे परिसरात वाघाच्या छाव्यांचे ठसे प्राप्त झाल्याने प्रा.केरकर यांनी दिलेल्या माहितीत तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आता हे जनावर येथीलच आहे की इतर राज्यातून भटकत इथे स्थलांतरित झाले आहे, हे मात्र कळण्यास मार्ग नाही, असेही डॉ.शशीकुमार यांनी मान्य केले. त्यात आता वाघाच्या हत्येचा विषय समोर आल्याने वन खाते तोंडघशी पडले आहे. केरी गावातील काही संशयित लोकांनी येथील एका राजकारण्याला धरून हे प्रकरण मिटवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या ठिकाणी कोणतेही अवशेष सापडले नसल्याने आता केवळ मोबाईलवरील छायाचित्र हा एकमेव पुरावा या संपूर्ण प्रकरणांत महत्त्वाचा ठरला आहे. मुळात मोबाईलवरील या छायाचित्राची तज्ज्ञांकडून तपासणी केली असती तर या छायाचित्राचे मूळ सहज सापडू शकले असते परंतु तसे न करता वन खात्याकडून प्रा.केरकर यांना लक्ष्य बनवण्याचे सत्र सुरू असल्याची टीका होत आहे. आपल्याच गावात घडलेल्या या प्रकाराबाबत उघडपणे वन खात्याला माहिती देऊनही अखेर आरोपींची नावेही त्यांनी सांगावी,अशा आविर्भावात वन खात्याचे अधिकारी वावरत असल्याने प्रा.केरकर यांच्याविरोधात येथील स्थानिकांचा रोष वाढावा यासाठीच ही शक्कल लढवली जात असल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे.
वाघाची हत्या करणे हा मोठा गुन्हा आहे व याप्रकरणी वन्य संरक्षण कायद्याअंतर्गत गंभीर सजेचीही तरतूद आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून वारंवार जबान्या बदलल्या जात असल्याचे डॉ.शशीकुमार म्हणाले. दरम्यान,आज खास चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेल्या भिवा वामन गांवस व अंकुश माजीन यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मुळात या संपूर्ण प्रकरणात प्रमुख संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या गोपाळ येसो माजिक यांनी दिलेल्या जबानीवरून या लोकांना चौकशीसाठी पाचारण केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान,हत्या झालेल्या वाघाचे मोबाईल छायाचित्र सुरुवातीस भिवा गांवस याच्याकडून मिळाल्याचा संशय होता, परंतु आपला मोबाईल गहाळ झाल्याची माहिती त्याने आज वनाधिकाऱ्यांना दिली. याबाबत पोलिस तक्रार केली आहे काय,असे विचारले असता मोबाईल गहाळ झाल्यास तक्रार करतात हे आपल्याला ठाऊक नाही,असे उत्तर त्याने दिल्याचे डॉ.शशीकुमार म्हणाले.
वनाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा
दरम्यान,दुचाकीवरून अपघात झाल्याचे सांगून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या सूर्यकांत माजीक याने आज अचानक आपल्याला वनाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा दावा खुद्द डॉ.शशीकुमार यांच्याकडे केला.. मुळात सूर्यकांत हा येथील गृहरक्षक विभागात कामाला आहे. एका सरकारी सेवकाला अन्य सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांकडून मारहाण होण्याचा हा प्रकार कितपत सत्य आहे याबाबत मात्र अद्याप कोणताही सबळ पुरावा हाती मिळाला नाही. सूर्यकांत याने गोमेकॉत दाखल होतानाही अशी कोणतीही माहिती डॉक्टरांना दिली नाही,अथवा पोलिस तक्रार केली नाही. केवळ डॉ.शशीकुमार यांनी त्याची भेट घेतली असता त्याने हा दावा केला आहे.याप्रकरणी त्याने श्री.शेटगांवकर व परेश परब या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.सूर्यकांत माजिक याचीही वाघ हत्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने जाणीवपूर्वक वन खात्याला बदनाम करण्यासाठी त्याने हा दावा केला जाण्याची शक्यता डॉ.शशीकुमार यांनी फेटाळला नाही.

No comments: