Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 December, 2009

न्यायालयीन कोठडीत आणखी एक मोबाईल

तुरुंग महानिरीक्षकांची बचावात्मक भूमिका
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे न्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत होता याचे कोणतेही पुरावे नाहीत, अशी बचावाची भूमिका आज खुद्द तुरुंग महानिरीक्षक तथा उत्तरेचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांनी घेतली आहे. तसेच, तुरुंगात मोबाईल मिळाल्याचा पोलिसांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे. मात्र, म्हापसा तुरुंग अधीक्षक डी. एम. रेडकर यांनी म्हापसा न्यायालयीन तुरुंग कोठडी क्रमांक ३ मध्ये एक मोबाईल संच मिळाल्याची माहिती दिली. तुरुंग यंत्रणेच्या या दोन अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांमुळे विरोधाभास निर्माण झाला असून तुरुंग व्यवस्थेचे "तीन तेरा' वाजल्याचे उघड झाले आहे. न्यायालयीन कोठडीत जो मोबाईल मिळाला आहे त्यात सिम कार्ड नसल्याचीही माहिती मिळाली आहे. आश्पाक बेंग्रे तुरुंगात मोबाईल वापरत असल्याचे पोलिसांनी जाहीर करताच तुरुंग यंत्रणेने बचावाची भूमिका घेतली आहे. योग्य वेळ येईल त्यावेळी आम्ही आश्पाक न्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत होता, याचे पुरावे देऊ, असा दावा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केला.
आश्पाक बेंग्रे हा न्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत होता, याचे कोणतेही पुरवे नाहीत. तसेच त्याला अनेक वेळा पोलिस आपल्या संरक्षणात सुनावणीसाठी तसेच वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. त्यामुळे त्याला कोणी मोबाईल पुरवला हे सांगता येणार नाही, असे श्री. वर्धन यांनी सांगितले. परंतु, याचा शोध घेण्यासाठी आम्ही चौकशी करणार आहोत. यात तुरुंग रक्षकाचा सहभाग आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्री. वर्धन यांनी "गोवादूत'शी बोलताना स्पष्ट केले.
'जॅमर'चा प्रस्तावही 'जॅम'...
न्यायालयीन कोठडीत जॅमर बसवण्याचा प्रस्ताव सरकारी प्रक्रियेतच "जॅम' होऊन पडला आहे. आश्पाकने तुरुंगात असताना बाहेर सुपारी देऊन प्राणघातक हल्ला घडवून आणल्याने "जॅमर'चा प्रस्ताव गेल्या आठ दिवसापूर्वीच तुरुंग महानिरीक्षकांनी सरकारला पाठवून दिला आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सर्व तुरुंगात मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विधानसभेत केली होती.
चौकशी अहवाल सादर...
आश्पाकला म्हापसा न्यायालयीन कोठडीत असताना कोण चिकन मटण पुरवत होता, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीचा अहवाल म्हापसा न्यायदंडाधिकारी डी. एम. रेडकर यांनी सादर केला आहे. आश्पाकला आठवड्यात केवळ एकाच वेळी चिकन किंवा मटण दिले जात होते. तसेच, त्याला भेटण्यासाठी शेवटची व्यक्ती दि. ७ सप्टेंबर ०९ रोजी न्यायालयात आली होती, याची नोंद ठेवण्यात आली आहे. त्या नोंद वहीची झेरॉक्स प्रत सादर केलेली असल्याचे श्री. रेडकर यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------------
आश्पाक बेंग्रे हा न्यायालयीन कोठडीत मोबाईल वापरत होता, याचे कोणतेही पुरवे नाहीत. आपण कोठडीत मोबाईल वापरत होतो, अशी माहिती आश्पाकने पोलिसांना दिली म्हणून त्या खोटारड्या आश्पाकच्या माहितीवर आम्ही कसा विश्वास ठेवू शकतो... - तुरुंग महानिरीक्षक, मिहीर वर्धन
-----------------------------------------------------------------------
योग्य वेळ येईल त्यावेळी आश्पाक बेंग्रे कोणत्या कोठडीतून कसा मोबाईल वापरत होता हे उघड करू.- पोलिस अधीक्षक (स्पेशल सेल), आत्माराम देशपांडे

No comments: