Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 December, 2009

न्हावेली कोमुनिदादीत गौडबंगाल

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): न्हावेली-साखळी कोमुनिदादची १,४९,५०० चौरस मीटर जागा एका बिगर गोमंतकीय खाजगी कंपनीच्या घशास घालण्यासाठी बेकायदा लीज करार करणाऱ्या या कोमुनिदादच्या हंगामी समितीची महसूल खात्याने नुकतीच उचलबांगडी केली आहे. तसेच हंगामी समितीने केलेल्या या व्यवहाराची कसून चौकशी करण्याचे आदेशही उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बेकायदा व्यवहारात एक बडा राजकीय असामी असून त्यानेच बनावट नावाने हा व्यवहार घडवून आणला असल्याचा आरोप कोमुनिदादच्या काही गावकर मंडळींनी लेखी तक्रारीद्वारे केला आहे. या व्यवहाराची दक्षता खात्यामार्फतही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
न्हावेली साळी कोमुनिदादच्या मतदार यादीत अनेक बनावट नावे घुसडण्यात आल्याची तक्रार कोमुनिदादच्या काही सदस्यांनी केल्यानंतर, नवीन मतदार यादी बनवणे तसेच कोमुनिदादची निवडणूक घेणे असे मर्यादित उद्दिष्ट निश्चित करून महसूल खात्याने या कोमुनिदादवर केवळ तीन महिन्यांसाठी एक हंगामी समिती नेमली होती. गुरूदास जयराम गावस यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत पंढरी पुरुषोत्तम गावस (पर्यायी अध्यक्ष), प्रकाश मंगेश गावस (ऍटर्नी), मदन तुळशीदास गावस (पर्यायी ऍटर्नी), रमेश पांडुरंग गावस (खजिनदार) व मधुकर बेतू गावस (पर्यायी खजिनदार) यांचा समावेश होता. प्रत्यक्षात २ एप्रिल २००७ रोजी समितीचे नेमणूक पत्र निघाले, त्या नुसार २ जुलै २००७ रोजी तिचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र त्यानंतरही तब्बल दोन वर्षे ही समिती तशीच कायम राहिली. या दोन वर्षांच्या कालखंडात समितीच्या सदस्यांनी अनेक गैरप्रकार केल्याचे कोमुनिदादच्या इतर सदस्यांचे म्हणणे असून सर्व्हे क्रमांक १३०/० मधील वरील सुमारे दीड लाख चौरस मीटर जमीन लाटण्याचा प्रकार त्यांपैकी एक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात कालिदास आनंद गावस (पेरवाडा न्हावेली), विश्वंभर दत्ता गावस (बोरणीवाडा - न्हावेली) व नारायण नागेश गावस (दुरीगवाडा - न्हावेली) यांनी १३ जुलै २००९ रोजी राज्याचे मुख्य सचिव, महसूल सचिव, दक्षता खात्याचे संचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तसेच कोमुनिदाद प्रशासक म्हापसा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सरकारने समिती बरखास्त केली असली तरी समितीने आपल्या अधिकारांच्या मर्यादेबाहेर जाऊन केलेल्या व्यवहारांचे काय? याचे उत्तर मात्र सरकारकडून तक्रारदारांना देण्यात आलेले नाही.
हा जमीन व्यवहार मेसर्स सिंप्लीफाईड टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या ९०४, गौरव हाईटस्, पंचशील एन्क्लेव्हज, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम) मुंबई ४०००६७ असा कार्यालयीन पत्ता असलेल्या बिगर गोमंतकीय कंपनीशी करण्यात आला आहे. खाण व्यवसायासाठी ही जमीन मागण्यात आली असून तिचा वापर खाण "रिजेक्शन' टाकण्यासाठी केला जाणार असल्याची शक्यता आहे. ही कंपनी बेनामी असण्याची शक्यताही तक्रारदारांनी व्यक्त केली असून अलीकडेच दुसऱ्यांच्या नावे राजकारण्यांनी ती स्थापन केली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्या १३२/० या सर्व्हे क्रमांकात ही जमीन आहे ती खडकाळ तसेच पडीक जमीन असल्याचे संबंधितांनी लीज करार करताना भासवले आहे; परंतु प्रत्यक्षात तेथे शेत जमीनही आहे व जंगली झाडेही आहे. गोठण किंवा गुरे चरण्याची जागा म्हणून वर्षानुवर्षे या जमिनीचा वापर केला जात आहे. त्यामुळे ही जागा लीजवर देणे शक्य नाही. ज्या जुजबी किमतीत ती लाटण्यात आली आहे तो व्यवहारही संशयास्पद आणि धक्कादायक असून या जमिनीचा विद्यमान दर सुमारे ७०० रुपये चौरस मीटर असताना लीजच्या पोटी दर किमान २०० रुपये प्रती चौरस मीटर येणे आवश्यक असताना कंपनीने मागणी केल्याप्रमाणे १० रुपये प्रती चौरस मीटरने केलेला हा व्यवहार न पटण्याजोगा आहे. अर्थात हंगामी समितीला असा व्यवहार करण्याचा अधिकारच नाही हा त्यातला खरा मुद्दा आहे. अशावेळी सरकारने या एकंदर व्यवहाराची कसून चौकशी करावी व दोषींविरुद्ध कठोर पावले उचलावीत अशी मागणी समितीच्या सदस्यांनी केली आहे.
या संदर्भात सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयातही जाण्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे. कोमुनिदादच्या हंगामी समितीकडून करण्यात आलेल्या या संशयास्पद व्यवहाराची जोरदार चर्चा न्हावेली, कुडणे, साखळी, पाळी व आसपासच्या परिसरात सध्या जोरात सुरू आहे.

No comments: