Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 11 December, 2009

आरोग्यमंत्री आश्वासनाला जागले नाहीत!

गोमेकॉतील चतुर्थश्रेणी कामगारांचे निषेध धरणे
पणजी, दि. १०(प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय, मानसोपचार केंद्र व क्षयरोग इस्पितळात गेली कित्येक वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करीत असलेल्या चतुर्थश्रेणी कामगारांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन पाळण्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना अपयश आल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. या कामगारांना डावलून आपल्या मर्जीतील कामगारांची भरती करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने या कृतीचा निषेध करण्यासाठी आज कामगार संघटनांतर्फे गोमेकॉच्या आवारात निषेध धरणे धरण्यात आले.
गोमेकॉ, मानसोपचार केंद्र व क्षयरोग इस्पितळात सुमारे २०८ सफाई कामगार गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत. या कामगारांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवून त्यांची पिळवणूक सुरू आहे. या कामगारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला आहे. तसेच त्यांना घरी पाठवून आपल्या मर्जीतील लोकांची भरती करण्याच्या हालचाली सुरू असल्याने आज अखिल भारतीय कामगार संघटनेच्यावतीने याठिकाणी धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, प्रसन्न उट्टगी, सफाई कामगार संघटनेच्या नेत्या अनिषा नाईक आदी हजर होते. गोमेकॉचे डीन डॉ. जिंदाल यांना यावेळी निवेदनही सादर करण्यात आले.
या कामगारांवरील अन्यायाविरोधात कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी गेल्यावर्षी आमरण उपोषण केले होते. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, वीजमंत्री आलेक्स सिकेरा व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी हस्तक्षेप करून या विषयावर तोडगा काढून या कामगारांना सेवेत नियमित करण्याचे आश्वासन दिले होते. या घटनेनंतर आत्तापर्यंत या कामगारांपैकी एकालाही सेवेत नियमित करण्यात आलेले नाही, उलट त्यांच्यावर बेरोजगारीची टांगती तलवार टांगून ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पुढे पुन्हा एकदा आंदोलन केल्यानंतर ७ ऑक्टोबर २००८ रोजी आरोग्य खात्याच्या संयुक्त सचिवांनी एक आदेश जारी करून गोमेकॉत सुमारे २०० सफाई कामगारांची भरती करण्याचे ठरवले व त्यांना प्रतिमहिना ३८२५ रुपये पगार देण्याचेही ठरवण्यात आले. त्यानंतर १ ऑगस्ट २००९ रोजी या कामगारांच्या वेतनात फेरसुधारणा करून हे वेतन ५७४० रुपये प्रतिमहिना करण्यात आले. आता सरकारने अचानक आपल्या निर्णयात बदल करून हे वेतन कमी करण्याचे ठरवले आहे. या कामगारांना आता प्रतिमहिना ३९९० रुपये पगार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती श्री. फोन्सेका यांनी दिली. हा अन्याय अजिबात सहन करून घेणार नाही, असा निर्धार करीत त्यांनी सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून आपल्या मर्जीतील १६० जणांना भरती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पदांवर नव्या कामगारांची भरती करण्यापूर्वी या कामगारांना सेवेत नियमित करण्यावर खुद्द सरकारनेच सहमती दर्शवली असतानाही पडद्यामागे भलतेच राजकारण सुरू असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

No comments: