Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 8 December, 2009

गोव्याचा सुगंध कायम हृदयात राहील

मोहन वाघ यांचा अष्टदशकपूर्तिनिमित्त गौरव
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): गोव्याची माती ही लाल आहे, तसे पाहिले तर सर्व ठिकाणची माती लालच असते. परंतु, गोव्यातील मातीत जो गोड सुगंध आहे तो येथील घराघरांतून जाणवतो व त्यामुळे येथील लोकही सुगंधित झालेले आहेत. हा गोड सुगंध आपल्या हृदयात कायम राहील, असे उद्गार नाट्यनिर्माते तथा नेपथ्य व छायाचित्रकार मोहन वाघ यांनी आज सायंकाळी येथील रवींद्र भवनात त्यांच्या अष्टदशकपूर्तिनिमित्त आयोजित गौरव सोहळ्याला उत्तर देताना काढले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गौरव समितीचे अध्यक्ष रमाकांत पै आंगले व उपाध्यक्ष भाई नायक यांच्या हस्ते त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सौ. सुप्रिया नाटेकर यांच्या हस्ते सौ. पद्मश्री वाघ यांची खणानारळाने ओटी भरण्यात आली.
कला व संस्कृती खाते व गौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई तसेच आमदार दामोदर नाईक उपस्थित होते. व्यासपीठावरील अन्य उपस्थितांत गणेश आजरेकर व वाघ यांच्या कन्या सौ. शर्मिला राज ठाकरे यांचा समावेश होता.
पुढे बोलताना वाघ यांनी आपल्या आई वडिलांची आठवण काढली. आपल्या या यशाचे सारे श्रेय त्यांनाच जाते असे ते म्हणाले. आपली जन्मभूमी जरी कारवार व कर्मभूमी मुंबई राहिलेली असली तरी प्रेमभूमी गोवाच आहे. येथील लोकांनी भरभरून दिलेले प्रेम आपण कदापि विसरणार नाही. गोव्यात सर्व काही खरे आहे, खोटेपणा - नकलीपणा याला येथे थारा नाही हेच या राज्याचे वैशिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.
मुंबईची महती सांगताना ते म्हणाले, गुण असतील तर त्याची हमखास कदर याठिकाणी होते, असाच अनुभव मला मिळाला आहे. नाटक व छायाचित्रण हा आपला श्र्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. नाटककार वसंत कानिटकर यांनी स्वतःच्या मुलीचे चंद्रलेखा हे नाव आपल्या नाट्य संस्थेसाठी सुचविले व ती संस्था नेहमीच चंद्रकलेप्रमाणे विस्तारत गेली. आपण नेहमी आयुष्य हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी असते, या वचनाचा अंगीकार केला व तीच आपली सर्वश्रेष्ठ पुंजी मानली, असे ते म्हणाले.
डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी यावेळी बोलताना, मोहन वाघ हे एक कलाकार म्हणून कसे सर्वश्रेष्ठ आहेत व त्यांनी कला व संस्कृती क्षेत्रासाठी दिलेले योगदान किती महत्त्वपूर्ण आहे ते विषद केले. मोहन वाघ व चंद्रलेखा हे समीकरण होऊन बसलेले आहे. त्यांनी सादर केलेले नाट्यप्रयोग हा एक विक्रम असल्याचेही त्यांनी नमूद केले. कलाकार हा समाजपुरुषाला प्रगल्भ व अभिरुचीसंपन्न करीत असतो, जबाबदारीची जाणीव करून देत असतो. मोहन वाघ यांनी हे काम केलेच शिवाय दर्जेदार नाटकांद्वारे रसिकांच्या मनाची नस पकडली, हे त्यांचे आणखी एक कसब होय, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अशा कलाकाराचा सत्कार करण्याची संधी आपणास मिळावी हे आपले भाग्य असल्याचे सांगितले. या गौरवामागे तमाम गोमंतकीयांची कृतज्ञतेची भावना आणि आत्मीयता आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार दामोदर नाईक यांनी, मोहन वाघ ही रसिकांवर मोहिनी घालणारी महान व्यक्ती असल्याचे सांगताना त्यांच्या सोळा हजार नाटकांच्या प्रयोगांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या कसोटी मालिकेतील सोळा हजार धावांच्या तोडीचा असल्याचे सांगितले. आजवर मिळालेले नानाविध पुरस्कार पाहता त्यांना पद्मश्री किताब दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
प्रा. दामोदर काणेकर यांच्या ईशस्तवनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. गौरव समितीचे अध्यक्ष रमाकांत आंगले यांनी स्वागत केले तर भिकू पै आंगले यांनी वाघ यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उलगडला व नंतर मानपत्र वाचनही केले. यावेळी गौरव समितीतर्फे मुख्यमंत्री व पांडुरंग फळदेसाई यांनाही स्मृतिभेट देण्यात आली. सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. शीतल नाटेकर यांनी आभार मानले.

No comments: