Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 July, 2009

"मुलांना नकार सहन करायला शिकवा'

अनघा वाचासुंदर स्मृतिदिनी प्रा. दवणे यांचे आवाहन

सौ. शिल्पा डोळे

पणजी, दि. १९ - मुलांचे व्यक्तिमत्व संपन्न बनवायचे असेल तर त्यांना नकार सहन करायला शिकवा; कारण तीसुद्धा यशाची एक पाकळी असते. उन्हाची चव, पावसाचा गंध, चिखलाची मृदुता आणि पर्वत चढतानाचे खरचटणे या सर्वांतून मुलांना जाऊ द्या, असे विचार विख्यात लेखक तथा कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी आज येथे व्यक्त केले.
पणजीतील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात अनघा वाचासुंदर या कळीच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.प्रा. दवणे यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने श्रोते आल्यामुळे सभागृह तुडुंब भरले होते. पालक व मुले यांचे नाते कसे असावे यावरच ते भरभरून बोलले.
आज मुलांना घडवताना आपण त्यांच्या सगळ्या गरजा पुरवतो, पण त्याला माणूस म्हणून घडवतो का, याचा विचार प्रत्येक पालकाने अंतर्मुख होऊन करावा. मुलाने नव्वद टक्के गुण मिळवले म्हणजे त्याचे जीवन परिपूर्ण झाले असे नव्हे. कलाक्षेत्र व बाह्यजग याबद्दल त्याच्या जाणिवा कितपत रुंदावल्या आहेत, जगणे आणि टिकणे यातील फरक त्याला कळतो काय, आपण कधी या तरुणाईच्या हाती "दासबोध' दिला काय, असे कळीचे सवाल विचारत प्रा. दवणे यांनी अलगदपणे उपस्थितांच्या काळजाला हात घातला. मुलाच्या आवश्यक गरजा भागवून केले जाते ते पालन आणि ललित, साहित्य संस्कृतीची ओळख करून देणे म्हणजे पोषण. आपण ते युवा पिढीला कितपत देतो? त्यासाठी आधी पालकांनी जीवनातील निखळ आनंद लुटायला शिकले पाहिजे, तरच तुम्ही तो मुलांना देऊ शकाल. पुढील पिढीत तो रुजेल जसा वाचासुंदर कुटुंबाने रुजवला आहे. वाचासुंदर यांच्या घरातील भिजवणारी सकाळ सजवणारी झाली आहे. हा सारा कार्यक्रम म्हणजे स्मृतिदिन न होता तो स्फूर्ती उत्सव व्हावा, असे प्रा. दवणे म्हणाले.
बक्षीस समारंभ मुलांसाठी असतो. मात्र अनेकदा पालकच बक्षीस स्वीकारायला येतात, कारण मुलगा म्हणे कुठल्या तरी क्लासला गेलेला असतो. दोन तास बसून एखाद्या कार्यक्रमाचा आनंद लुटणे, बक्षीस स्वीकारण्यातील मजा चाखणे हे अनुभव मुलांनी घेतले पाहिजेत. आजचे आयुष्यच कचकड्याचे झाले आहे. माध्यमे सांगतात तुम्ही सुंदर दिसा. त्यामुळे आपणही वस्तूंच्या या बाजारात नकळत स्वतःच "वस्तू' बनून जातो. आज सुख गोठले आहे. भावनांचे घरच ज्या समाजात नाही तो समाजच मृतवत झालाय, असे मी मानतो. आपण मुलांना संपन्न व्यक्तिमत्व दिले काय? जगण्याचे कारण, कुवत, क्षमता, उद्दिष्ट यांची ओळख आपल्या मुलांना आहे काय, असे बिनतोड सवाल त्यांनी केले.
प्रा. दवणे म्हणाले, तारुण्यातच वार्धक्याचा शोध घ्या. ते होत नाही म्हणून माणूस क्रूर बनत चाललाय. निरपेक्षतेचे अष्टगंध कुठेच दिसत नाही. मुलगा जेव्हा श्रोता म्हणून कमी पडतो तेव्हा ते पालकांचे अपयश असते. घरात जसा फुलांचा सुगंध येतो तसाच भ्रष्टाचाराचा दुर्गंधही येतो. त्यावरच मुले पोसली जातात. आपण ठरवले तर हे थोपवू शकतो. जिथे सत्य आहे तिथेच विजय असतो. म्हणूनच काळ कोणताही असो, प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलन करूनच होतो, अगदी आजसुद्धा.
दुसऱ्याच्या दुःखाचा आनंद लुटणे याला विकृती असे म्हणतात. खरेच आज माणूस कमालीचा विखारी होत चाललाय. हे दुष्टचक्र रोखण्यासाठी आपण सारेच निखळ आनंद लुटूया. गेल्या तीस वर्षांचे अध्यापन, लेखन सार्थकी लावणारा क्षण वाचासुंदर प्रतिष्ठानने मला दिला. मी एकटा तरुण पिढी घडवू शकत नाही. तुम्हीही माझ्यासोबत हे आव्हान पेलण्यासाठी या, असे आवाहन दवणे यांनी केले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
प्रा. अनिल सामंत यांनी खुसखुशीत शैलीत प्रा. दवणे यांची आणि त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. माणूस घडवण्यावर प्रा. दवणे यांची भक्ती आहे. घराच्या शांतीसाठी आपण वास्तुशांत करतो, खरे म्हणजे आपण "व्यक्तिशांती' करायला हवी, असे रमेश सप्रे यांनी सांगितले. संस्थेचे एक पदाधिकारी श्री. मेढेकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. श्रेया वाचासुंदर यांनी अनघाच्या जीवनप्रवासाबद्दल सांगताना प्रतिष्ठानतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. समुपदेशन केंद्रात उपलब्ध असलेल्या चाचण्यांबद्दलही त्यांनी श्रोत्यांना अवगत केले. विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रा. दवणे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. संगीता अभ्यंकर यांनी सूत्रनिवेदन केले. आनंद वाचासुंदर यांनी आभार मानले. मानसी प्रभू यांनी पसायदान गाऊन कार्यक्रम "संपन्न' झाला.
आईच्या हातचे लाडू..
प्रा. दवणे म्हणाले, आज घरात एकत्र बसून जेवणे, गप्पा मारणे, चर्चा करणे या गोष्टीच दुर्मीळ झाल्या आहेत. आईच्या हातच्या लाडवांपेक्षा विकतचे लाडूच जेवणाच्या टेबलावर दिसतात. आईच्या स्पर्शाचे लाडू न खाणारी मुले उतारवयात तुम्हाला मिठी मारतील, अशी अपेक्षाच पालकांनी करू नये.

No comments: