Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 22 July, 2009

सरकारी भ्रष्टाचारामुळे सामान्य माणूस जेरीस पर्रीकरांकडून कामत सरकारचे वाभाडे

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): बेकायदा खाण व्यवसाय व कॅसिनोंमुळे राज्यातील सामाजिक सुरक्षाच धोक्यात आली असून सामान्यांना कॅसिनो जुगारापासून वाचविण्यासाठी समस्त गोमंतकीयांनाच त्यावर प्रवेश निर्बंध लागू करा अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत केली. सभागृहात अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना सरकार राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत खोटे चित्र निर्माण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही परिस्थिती सुधारायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी कडक भूमिका घेणे आवश्यक असून प्रसंगी आपल्या काही सहकाऱ्यांचा रोषही पत्करण्याचीही तयारी त्यांनी ठेवायला हवी, असेही श्री. पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पावरील या चर्चेत नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण मुद्दे मांडताना पर्रीकर यांनी आज विविध विषयांसंदर्भात सरकारचे वाभाडेच काढले. "आम आदमी'चे सरकार म्हणवून घेणाऱ्यांकडून प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेची कशी विटंबना सुरू आहे, त्याचा पाढाच पर्रीकरांनी सभागृहासमोर वाचला. कॅसिनो जहाजांना परवाना देताना संबंधितांनी अनेक प्रकारच्या भानगडी केल्या असून भू-कॅसिनोंवर जेथे केवळ इलेक्ट्रॉनिक गेम चालायला हवी तेथे सर्रासपणे रोख पैशांचा जुगार सुरू असल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षी एकूण २ लाख ९२ हजार लोकांनी कॅसिनोंवर हजेरी लावली होती तर आता गेल्या तीन महिन्यातच ८६ हजार लोक कॅसिनोंवर खेळायला गेल्याचे आकडेवारी सांगते. या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांचा समावेश असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले. कॅसिनो जुगाराचे संभाव्य परिणाम सांगताना ते म्हणाले, जुगाराचे परिणाम एवढे धोकादायक आहेत की खुद्द रशियाने चार हजार कॅसिनो बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इथल्या नागरिकांना आणि विशेष करून तरुण पिढीला या व्यसनातून वाचवायचे असेल तर इथल्या किमान स्थानिकांवर कॅसिनोंत प्रवेश करण्यास बंदी घालावी असा पुनरुच्चार त्यांनी केला.
बेकायदा खाणीचे संकट आज संपूर्ण गोव्यालाच ग्रासू पाहत असल्याचे सांगताना, बेकायदा खाणींनी राज्यात उच्छाद मांडला असून वन खात्याने केलेल्या निरीक्षणांत सुमारे ७ खाणी खुद्द अभयारण्य क्षेत्रातच सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. गेल्या तीन वर्षांपूर्वी राज्यात ७१ खाणी सुरू होत्या तो आता हा आकडा ११६ वर पोहचला आहे. वनक्षेत्राची नासाडी होत असल्याने वन्यप्राणी लोकवस्तीत घुसत आहेत. कुशावती नदीच्या काठी खनिज उत्खननामुळे ही नदी खनिज गाळाने आहे. खाणींमुळे साळावळी धरणालाही धोका निर्माण झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून खाण परवाने देताना कोणत्याही गोष्टींचा विचार केला जात नसल्याने याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचेही पर्रीकर म्हणाले. अभयारण्य क्षेत्रात कायदेशीर खाण व्यवसायही चालूच शकत नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सरकारच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने छापलेल्या पुस्तिकांवर २४ लाख इतका प्रचंड खर्च करण्यात आला. नोकरभरती जोरात सुरू असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा लवकरच ५१ हजारांच्या घरात पोहचेल. सरकारचे आर्थिक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाववाढीमुळे सर्वसामान्य जनता भरडली जात असल्याचे सांगून खुद्द भाववाढ नियंत्रण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या वस्तूंच्या किमती गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांनी वाढल्या, यावरून भाववाढीवरून सामान्यांची काय स्थिती झाली असेल हे लक्षात येते. लोकसभा निवडणुकीपूर्वी कदंब कर्मचाऱ्यांना दिलेले सहावा वेतन लागू करण्याचे आश्वासन खरे नसेल तर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्वरित निलंबित करा व हे आश्वासन खरे असेल तर त्याची ताबडतोब कार्यवाही करा, असे सांगून कदंब महामंडळाचे कामगारही आम आदमीच आहेत, त्यामुळे त्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळ मांडू नये,असेही त्यांनी यावेळी सुनावले. पर्वरी येथे पाणी टंचाईमुळे येथील लोकांचे हाल होत आहेत. पणजीत दूषित पाण्यासंबंधी १२ तक्रारी दाखल झाल्या असताना महापालिकेकडून पाइपलाइन टाकण्यास मान्यता दिली जात नाही. दूषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडले, काविळी सारखा आजार त्यांना झाल्यास त्याला नगरविकास मंत्री जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यात वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे सांगून वीज खात्यातर्फे खरेदी करण्यात आलेल्या "सिएफएल'बल्ब प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा उघड आरोपही पर्रीकर यांनी यावेळी केला. सरकारने ५५३ रुपयांत खरेदी केलेले हे बल्ब मुंबईत ३०० रुपयांत मिळतात,अशी माहितीही त्यांनी दिली. सरकारकडून पैशांचा उघडपणे गैरवापर सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काहीतरी चांगले करण्याची ताकदच नसल्याने या सरकारकडून सर्वसामान्यांची निव्वळ बोळवण सुरू असल्याची टीकाही पर्रीकर यांनी यावेळी केली.

No comments: