Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 20 July, 2009

धावे खाणप्रश्नी विधानसभेत स्थगनप्रस्ताव मांडण्याची मागणी

नगरगाव ग्रामसभेत विरोधाची धार तीव्र

वाळपई, दि. १९ (प्रतिनिधी) - धावे व ब्रह्माकरमळीतील नियोजित खाणीच्या प्रश्नावर उद्या सोमवार दि. २० जुलैपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव आणावा अशी जोरदार मागणी सरपंच सौ. सुमित्रा नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरगाव - सत्तरीच्या ग्रामसभेत नागरिकांनी केली आहे. याप्रसंगी व्यासपीठावर पंच बाबलो गावकर, देविदास पर्येकर, हरिश्चंद्र मानकर, राजेंद्र अभ्यंकर, सचिव श्री. गावस, लक्ष्मण गावस आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना वल्लभ केळकर यांनी सांगितले की धावे व ब्रह्माकरमळी येथे होणाऱ्या नियोजित खाणीमुळे म्हादई नदीचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे व त्यामुळे संपूर्ण उत्तर गोव्यात पाण्याची तीव्र समस्या जाणवण्याची शक्यता आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन याप्रश्नी आता लोकनियुक्त विधानसभेतच स्थगनप्रस्तावाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. श्री केळकर यांनी केलेल्या मागणीला ऍड. शिवाजी देसाई यांनी आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला व सदर खाणीसंदर्भात खाण कंपनीने नगरगाव पंचायतीला पाठवलेल्या पर्यावरणीय अहवालावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले की, सदर अहवाल वस्तुस्थितीला धरून नाही; अहवालात फार मोठ्या प्रमाणात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पुरवण्यात आली असून नगरगाव पंचायत क्षेत्राचा व्यवसाय मासेमारी व खनिज उत्खनन असा दाखवण्यात आला आहे. हे सारे खोटे आहे असे त्यांनी सांगितले व या अहवालावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा केली गेली. सरकारने हा अहवाल स्वतः पडताळून पाहावा व सत्यपरिस्थिती लोकांसमोर ठेवावी असे याप्रसंगी एकमुखाने सांगण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अशोक जोशी म्हणाले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सार्वजनिक सुनावणीवेळीही जेव्हा लोकांचा खाणीसारख्या प्रकल्पास मोठा विरोध होतो त्यावेळीसुद्धा लोकांच्या विरोधाला व हरकतींना न जुमानता प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक खाण कंपन्यांना खाण सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला दिला आहे. मंडळाच्या या कारभाराची त्यांनी अनेक उदाहरणे दिली व त्यानंतर आता सरकारने या मंडळाने दिलेल्या अहवालावर सखोल चौकशी करून श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. वाळपईचे आमदार व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा खाणविरोधी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत भास्कर गाडगीळ, प्रसाद खाडिलकर, सुरेश जोशी आदींचा सहभाग होता. मागील ग्रामसभेचा वृत्तांत सचिव श्री. गावस यांनी वाचून दाखवला. शेवटी सौ. नाडकर्णी यांनी आभार मानले.

...तर नकाशावरून
धावे गावच गायब

धावे येथे जर नियोजित खाण सुरू झाली तर गोव्याच्या नकाशावरून धावे गावच गायब होईल अशी भीती खाणविरोधी सभेत वर्तवण्यात आली. त्यामुळे खाणप्रकल्पाला प्राणपणाने विरोध करण्याचे व त्यासाठी अचूक रणनीती आखण्याचे ठरवण्यात आले. तसेच येत्या काही दिवसांत वाळपई येथे मोठा मोर्चा काढण्याचेही ठरवण्यात आले.
येणाऱ्या काळात खाणविरोधी लढा अधिक तीव्र करण्याचा व खाण मालकांकडून येणाऱ्या आमिषांना बळी न पडण्याचा निर्धार करण्यात आला व खाणविरोधी समितीही नेमण्यात आली.

No comments: