Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 September, 2008

कुठ्ठाळी येथे तणाव

बाणावलीच्या युवकास "संशयित अतिरेकी' म्हणून ताब्यात घेण्याचा प्रयत्न
वास्को व मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी) - मंगळूर येथे चर्चवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास सभा आटोपून परतत असलेल्या बसेसची तपासणी सुरू असताना पोलिस आणि नागरिकांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकींमुळे आज संध्याकाळी कुठ्ठाळी येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. कोलवा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक एडविन कुलासो यांनी बाणावली येथील एका स्थानिक युवकाला "संशयित अतिरेकी' म्हणून अटक करण्याचा प्रयत्न केला असता प्रवाशांनी त्याला आक्षेप घेतला.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, निषेध सभेला उपस्थित राहण्यासाठी सहा बसेस भरून बाणावली येथील ख्रिस्ती बांधव पणजी येथे गेले होते. सभा आटोपून हे लोक बाणावली येथे परतत असता कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक एडविन कुलासो यांनी कुठ्ठाळी येथे या बसेस आडवल्या. राज्यात अतिरेकी असल्याची माहिती मिळाली असून त्यासाठी तपासणी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत खास पोलिस दल कुठ्ठाळी येथे तैनात होते. तपासणी करतेवेळी त्यांनी एका युवकाला अतिरेकी असल्याचा संशय व्यक्त करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता बसमधील प्रवाशांनी त्याला आक्षेप घेतला. सदर युवक बाणावली येथील असून अतिरेकी कारवायांशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे लोकांनी सांगितले. पोलिसांनी केवळ बाणावली येथील बसेस रोखून धरल्या व इतर बसेस सोडल्याने पोलिस आणि सदर बसमधील प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
सुमारे दोन तासानंतर प्रकरण हाताबाहेर जात असल्याने तसेच या घटनेची माहिती मिळाल्याने मुरगावचे पोलिस उप अधीक्षक देऊ बाणावलीकर तसेच उपअधीक्षक उमेश गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, निरीक्षक एडविन कुलासो यांना तपासणी करण्याचे कोणतेच आदेश देण्यात आले नसल्याचे तसेच आपल्याला या प्रकरणाबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितल्याने लोकांनी गोंधळ केला. कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक किंवा इतर कोणालाही अशा प्रकारचे आदेश देण्यात आले नसल्याचे सांगून त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तथापि, जनक्षोभापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. यावेळी पोलिस उपअधीक्षक बाणावलीकर यांनी कोलव्याचे निरीक्षक कुलासो यांच्या वतीने लोकांची माफी मागितली.
दरम्यान, मडगावचे पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. कुठ्ठाळी परिसर वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने पत्रकारांनी वेर्णाचे पोलिस निरीक्षक नालास्को रापोझ यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला अतिरेकी कारवाईसंदर्भात तपासणी सुरू असल्या प्रकरणी कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचे सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एडविन कुलासो यांनी या प्रकरणी लोकांची माफी मागितल्यावर कुठ्ठाळी येथील प्रकरण तात्पुरते मिटले होते. उपलब्ध माहितीनुसार कुलासो यांच्याजवळ कालच्या बाणावली पंचायतीची सभा उधळल्याच्या प्रकरणात सक्रिय सहभाग घेतलेल्या सुमारे ३५ व्यक्तींच्या नावाची यादी होती.
दरम्यान, मेगा प्रकल्प विरोधकांपैकी ज्योकिम सिल्वा यांना कुठ्ठाळी येथे पोलिसांनी अटक करून नंतर त्यांना जामिनावर सोडले. ते पणजी येथे सर्वधर्म सभेसाठी गेले होते. या सर्व प्रकाराची कुणकुण लागताच बाणावलीतील सुमारे पाचशेवर लोक पोलिसांना या कारवाईचा जाब विचारण्यासाठी कोलवा पोलिस स्टेशनवर जमा झाले. ते रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता.

No comments: