Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 September, 2008

बाणावली सरपंचांच्या घराची प्रचंड नासधूस

संतप्त जमावाकडून कृती
पंचाच्या घरावर हल्ला
चार वाहनांना हानी
१०० अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

मडगाव, दि.१७ (प्रतिनिधी) : गेल्या दोन दिवसांपासून बाणावली पंचायत क्षेत्रात सुरू असलेल्या मेगा प्रकल्प विरोधी आंदोलनकर्त्यांमध्ये पसरलेल्या असंतोषाची परिणती काल मध्यरात्री पाहायला मिळाली. सरपंच कार्मेलीन फर्नांडिस व पंच झेवियर परेरा यांच्या घरावर संतप्त जमावाने हल्ला करून प्रचंड नासधूस केली . सरपंचांच्या दोन चारचाकी वाहनांचीही या हल्ल्यात नासधूस झाली. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी १०० अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. द. गोवा सरपंच मंचाने या प्रकाराचा निषेध करताना या परिस्थितीवर सरकारनेच काय तो तोडगा काढावा अशी मागणी केली आहे.
सोमवारी, गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेली पंचायत मंडळाची बैठक या मेगा प्रकल्प विरोधकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. सरपंचांनी या जमावाविरुद्ध पोलिस तक्रार नोंदविताना त्यांनी पंचायत कार्यालयातील फाइली पळवून नेल्याचे आरोप केले होते. कोलवा पोलिसांनी याची गंभीर दखल घेताना ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या जमावातील दोन प्रमुखांना अटक करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी कुठ्ठाळी येथे सर्वधर्म परिषदेसाठी बाणावलीतून गेलेल्या बसेस आडवल्या होत्या. या अटकेमुळे खवळलेल्या लोकांनी कुठ्ठाळी येथे गोंधळ घातला होता.
कोलवा पोलिसांचा हा पराक्रम बाणावलीतील नागरिकांना कळल्यावर तेथे रात्रौ ९-३० च्या सुमारास चर्चच्या घंटा वाजवून लोकांना मारीया हॉलपाशी जमविले गेले होते. या जमावाने पोलिस कारवाईचा निषेध करताना कोलवा पोलिस स्टेशनवर चाल केली होती.
यावेळी अटक केलेल्या दोघांनाही त्वरित हजर करण्याची मागणी या जमावाने केली असता त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास कोणताही पोलिस अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. कुठ्ठाळीतील अतिउत्साहामुळे अडचणीत आलेले पोलिस निरीक्षक एडविन कुलासो हे लोकांच्या असंतोषाला तोंड देण्याचे धैर्य नसल्याने वेर्णा पोलिस स्टेशनात बसून होते. तणाव वाढत असल्याची माहिती मिळताच उपअधीक्षक उमेश गावकर यांनी शेवटी कोलवा येथे धाव घेतली. लोकांना शांत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची कोणाचीच तयारी नव्हती. एडविन कुलासो व पकडलेल्या दोघांनाही हजर करा व अन्य सर्वांवरील तक्रारी मागे घ्या, अशी मागणी जमावाने केली. अखेर मध्यरात्री १२ वाजता उपअधीक्षक उमेश गावकर यांनी मागणी मान्य केल्यानंतर जमाव तेथून पांगला. परंतु, परतत असताना जमावाने सर्व घटनांना सरपंच कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांच्या बाणावली येथील घरावर चाल केली. सरपंच कार्मेलीन यांच्या घराची नासधूस करताना जमावाने तुफान दगडफेक केली. यावेळी घराची दारे, खिडक्या, कौले यांची पुरती वाताहत झालेली असून एक "मारुती व्हॅन' व एक "वॅगन आर'सह चार वाहनांचीही मोठी नुकसानी झाली आहे. सरपंच कार्मेलीन यांचे खंदे समर्थक असलेले पंच झेवियर परेरा यांच्या घराचीही अशीच नासधूस केली गेली . मध्यरात्री नंतरच्या या प्रकारामुळे बाणावलीतील परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली होती. आज सकाळी या घटनेचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, काल कुठ्ठाळी येथे कोलवा पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून कारवाई केली असा प्रश्र्न उपस्थित झाला आहे. कोलव्याचे पोलिस निरीक्षक एडविन कुलासो यांनी आपण वरिष्ठांच्या सूचनेवरून बसेस अडवून शोध घेतला असे म्हटले आहे. सदर संशयितांना मंगळवारी सायंकाळपर्यंत हजर करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार मडगावातील पंचायत संचालक व गटविकास कार्यालयात त्यांचा शोध घेण्यात आला होता. परंतु, संशयित आझाद मैदानावरील सभेला गेल्याची माहिती मिळाल्याने निरीक्षक कुलासो त्यांची कुठ्ठाळी येथे प्रतीक्षा करत होते व त्याची पूर्ण कल्पना वरिष्ठांना होती.
दरम्यान, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी अशा सूचना देण्यात आली नव्हती असे स्पष्ट करताना या प्रकाराची सर्वंकष चौकशी करून लगेच अहवाल सादर करण्याची सूचना उपअधीक्षक उमेश गावकर यांना केली आहे. गावकर यांनीही बसेस अडवून तपास करण्याची सूचना दिली नव्हती असे सांगितले आहे. हे दोन्ही अधिकारी कुलासो यांचे वरिष्ठ असून त्यांनी सूचना देण्यात आली नव्हती असे सांगितल्याने कुलासो यांना सूचना देणारा आणखी वरिष्ठ कोण असा सवाल केला जात आहे.

No comments: