Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 17 September, 2008

"रवींद्र भवना'साठी बहुतांश नेते आग्रही

राजीव कला मंदिराला चढणार नवी झळाळी
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी) - मडगाव येथे कित्येक कोटी रुपये खर्चून आकर्षक रवींद्र भवन उभारल्याने आता सरकारातील इतर नेत्यांना आपल्या मतदारसंघातही अशीच रवींद्र भवने हवीत असे स्वप्न पडू लागले आहे. गृहमंत्री रवी नाईक यांनी तर चक्क सध्याच्या राजीव गांधी कला मंदिराचा (फोंडा) पूर्ण कायापालट करण्याची योजना आखली आहे.
राजीव गांधी कला मंदिराच्या नूतनीकरणाचे काम गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याप्रकरणी वास्तूरचनाकार राहुल देशपांडे यांना सल्लागार नेमण्यात आले असून या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बहुगुणा यांनी दिली. हे केवळ दुरुस्तीकाम व काही किरकोळ बदल असतील, असे जरी भासवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रवी नाईक यांनी हा प्रकल्पच नव्याने उभारण्याचा घाट घातल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
प्रत्येक तालुक्यात एक रवींद्र भवन उभे करण्याचा संकल्प सरकारने सोडला असताना तसे न करता केवळ मंत्र्यांच्या इच्छेखातर कोट्यवधींचा खर्च करणे कितपत योग्य आहे,असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजीव कला मंदिराचे बांधकाम १९९२ साली रवी नाईक हे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते. त्यानंतर अनेक वर्षे हे काम रखडले. राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरच तब्बल दहा वर्षांनी या प्रकल्पाला नव्याने चालना मिळाली व अखेर हे कला मंदिर जनतेसाठी २००२ साली खुले करण्यात आले. पणजीतील कला अकादमीनंतर फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिर हे एक उत्कृष्ट नाट्यगृह आहे. अनेक व्यावसायिक नाटकेही तेथे सादर केली जातात व त्यांना प्रेक्षकांचा जोमदार प्रतिसाद मिळत आहे.
या कला मंदिराच्या इमारतीच्या बांधकामाला कित्येक वर्षे झाल्याने आता छप्पर जुने झाले असून पावसाचे पाणी आत झिरपत असल्याचे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. या छताचे "वॉटर प्रूफिंग' करूनही हे पाणी थांबत नसल्याची माहिती बहुगुणा यांनी दिली. कला मंदिरातील मा. दत्ताराम नाट्यगृह, परिषद सभागृहातही पावसाच्या पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे कला मंदिराच्या संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण करण्याची योजना सरकारने आखली आहे.
दरम्यान, कला मंदिराची इमारत ही मडगाव येथील रवींद्र भवनाप्रमाणे लक्षवेधी नसल्याने या इमारतीलाही नवी झळाळी देण्याचे ठरले आहे. नूतनीकरणाच्या काळात कला मंदिरातील कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहेत. कला मंदिरातील नाट्यगृहात नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याची योजना आहे. अशा प्रकारे हे नाट्यगृह विकसित केले जाणार आहे.

No comments: