Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 September, 2008

पंचायत खात्याकडून आता सरपंचांवर कारवाईचा बडगा

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): बाणावली सरपंचांच्या घरावर स्थानिकांनी हल्ला चढवल्याची घटना ताजी असताना आता पंचायत संचालनालयाने सुरू केलेल्या कारवाईमुळे काही सरपंच खरोखरच स्थानिक जनतेच्या रोषास पात्र ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
पंचायत खात्यातर्फे देण्यात आलेल्या आदेशांचे योग्य पालन न करणे तसेच वारंवार नोटीस पाठवूनही त्याबाबत स्पष्टीकरण न देणाऱ्या संरपचांवर कडक कारवाई करण्याचे पंचायत संचालनालयाने ठरवले आहे. या खात्याचे संचालक मिनीनो डिसोझा यांनी या वृत्तास दुजोरा दिला. गोव्यात विविध पंचायतींमध्ये मेगा प्रकल्पांवरून स्थानिक जनतेत कमालीचे वातावरण तापले आहे. मुळात स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन विविध प्रकल्पांना मंजुरी देण्याचे सोडून काही पंच आपल्या मर्जीप्रमाणे परवाने देतात. मग सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व सदर प्रकल्पास स्थानिकांकडून विरोध झाल्यावर हे प्रकल्प रद्द झाल्याचे खापर पंचायत संचालनालयाच्या डोक्यावर फोडतात. विविध प्रकरणी केवळ पंचायतींकडून झालेल्या चुकीमुळे पंचायत संचालकांना न्यायालयाने खडसावल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आता पंचायतीकडून झालेल्या चुकीमुळे सरपंचांना जबाबदार धरण्याचे सत्र सुरू झाले आहे.
पंचायतींकडे तांत्रिक कर्मचारी नसल्याने प्रकल्पांसाठी पंचायतीकडे पाठवण्यात आलेल्या फाईल्स विविध खात्यांकडे पाठवण्यात येतात. नगर नियोजन खाते,सार्वजनिक बांधकाम खाते आदींकडून या प्रकल्पांचा अभ्यास केला जातो व त्या आधारावर हे परवाने दिले जातात. मुळात हे परवाने देताना ठरावीक प्रकल्पाचा विचार करण्यात येतो. या प्रकल्पामुळे या परिसरावर नेमका कोणता परिणाम होणार याचा अजिबात विचार केला जात नाही. नगर नियोजन खाते प्रत्यक्षात पाहणी न करता उपलब्ध आराखड्यांच्या आधारावर परवाने देते. तथापि, हे आराखडे व नकाशे आणि वस्तुस्थिती यात बरीच तफावत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुळात अशा प्रकल्पांचा आराखडा तयार करून पंचायतीच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला जातो तेव्हा हे प्रस्ताव ग्रामसभेत सादर करून त्याबाबत जनतेला विश्वासात घेण्याची गरज असते. प्रत्यक्षात काही सरपंच मुकाट्याने हे परवाने देऊन टाकतात. कित्येक गावात बेकायदा बांधकामे उभी राहत असताना त्याविरोधात कारवाई करण्याचे सोडून काही सरपंच पंचायत संचालनालयाकडे बोट दाखवतात. आपली जबाबदारी झटकून या कामाचे खापरही त्या खात्यावर ढकलले जात असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. जोपर्यंत हे लोक जबाबदारीने आपले काम करणार नाहीत तोपर्यंत हे प्रकार असेच चालू राहणार असल्याने कारवाईचा बडगा उगारणे अत्यंत गरजेचे बनल्याचे सांगण्यात आले.

No comments: