Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 August, 2008

मुशर्रफ यांच्याविरुद्ध ११ रोजी महाभियोग

इस्लामाबाद, दि. ७ : पाकिस्तानातील सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरुद्ध ११ ऑगस्टला महाभियोग ठराव आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे मुशर्रफ यांची गच्छंती आता अटळ असल्याचे मानले जात आहे. "पाकिस्तान पीपल्स पार्टी'चे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि "पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज' (पीएमएल-एन) या दोन प्रमुख पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांनी दोन दिवस केलेल्या चर्चेअंती महाभियोग ठराव आणण्याचा निर्णय घेताना तशी अधिकृत घोषणा देखील केलेली आहे. मुशर्रफ यांना हटविण्याचा निर्णय घेतला गेला असल्याने पाकमध्ये पुन्हा जोरदार राजकीय वादळ येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनीही मुशर्रफ यांच्यावर टीका करताना "मुशर्रफ यांचा पदावर राहण्याचा कोणताही उपयोग राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी पायउतार होणेच चांगले,'असे म्हटले आहे.
""मुशर्रफ यांच्याविरुद्ध ११ ऑगस्टला महाभियोग आणण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मुशर्रफ यांना पदावरून हटविणे आवश्यक झाले आहे. त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र देखील भरले जाणार आहे. त्यांना पदावरून हटविताच बडतर्फ केलेल्या न्यायाधीशांची फेरनियुक्ती केली जाईल,''अशी घोषणा आसिफ अली झरदारी व नवाज शरीफ यांनी संयुक्तपणे केली.
या निर्णयामुळे मुशर्रफ यांनी आपला नियोजित चीन दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चीनमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुशर्रफ जाणार होते. परंतु झरदारी-शरीफ यांच्या संयुक्त घोषणेनंतर त्यांनी चीनचा दोन दिवसांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मुशर्रफ यांच्याच एका सहकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली, असे पीएमएल-एनचे प्रवक्ते एहसान इक्बाल यांनी दिली.

No comments: