Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 9 August, 2008

मुशर्रफ यांनी संसदेचे अधिवेशन बोलावले ११ ऑगस्टपासून महाभियोगाची शक्यता

इस्लामाबाद, दि. ९ : सरकारची शिफारस प्राप्त झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीचे विशेष अधिवेशन बोलावण्याची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, ११ ऑगस्ट रोजी हे अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. दरम्यान, या अधिवेशनात सत्तारूढ पाकिस्तान पीपल्स पार्टीतर्फे मुशर्रफ यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनात कुठले विषय उपस्थित होणार आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. अधिवेशन बोलावण्याच्या अधिसूचनेवर मुशर्रफ यांनी सोमवारीच स्वाक्षरी केली होती, अशी माहिती संसद अधिकाऱ्यांनी दिली.
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटचे अधिवेशन आधीपासूनच सुरू आहे. आता कनिष्ठ सभागृहाचेही अधिवेशन बोलावण्यात आले असल्याने मुशर्रफ यांच्या भवितव्याकडे केवळ पाकचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
दोन्ही सभागृहातील सदस्य संख्या ४४२ असून, यातील किमान निम्म्या सदस्यांनी महाभियोग प्रस्तावाची नोटीस सभागृहाच्या अध्यक्षांकडे देणे आवश्यक आहे. ही नोटीस स्वीकारण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येईल. राष्ट्राध्यक्ष या नात्याने चर्चेला उत्तर देण्याचा अधिकार मुशर्रफ यांना आहे. तथापि, त्यांनी उत्तर देणे बंधनकारक नाही.
मुशर्रफ यांना बाहेर घालविण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सत्तारूढ आघाडीकडे नसले तरी २९५ हा बहुमताचा आकडा प्राप्त होईल, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे. नॅशनल असेंब्लीत ३४२ सदस्य आणि सिनेटमध्ये १०० सदस्य आहेत.
संसदेत जर महाभियोग मंजूर झाला तर महाभियोगाच्या माध्यमातून सत्तेतून पायउतार होणारे मुशर्रफ हे देशातील पहिले नेते ठरतील.

No comments: