Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 3 August, 2008

हिमाचलमध्ये मंदिरातील चेंगराचेंगरीमध्ये 135 ठार

-300 हून अधिक जखमी
-पाऊस,भूस्खलनामुळे दुर्घटना

बिलासपूर, दि.3 - हिमाचलप्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात पालमपूरपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या नैना देवी मंदिरात आज चेंगराचेंगरी होऊन 135 जण ठार झाले तर 300 वर लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, हे मंदिर पहाडी भागात आहे. श्रावणात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. येथे श्रावणात मेळाही असतो. आजही येथे भाविकांची प्रचंड गर्दी होती. सोबतच पाऊसही जोरात होता. पावसामुळे या भागात भूस्खलन झाले आणि अचानक असे काही झाल्याने भाविकांची तारांबळ उडाली. त्यामुळेच चेंगराचेंगरी झाली.
हा परिसर पर्वतावर असल्याने येथे कठडे लावले होते. चेंगराचेंगरी सुरू होताच काही भाविक कठडे तुटल्याने दरीत जाऊन कोसळले. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब लोकांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही प्रशासकीय अधिकारही त्वरित पोहोचले. पावसामुळे येथील बचाव कार्यात अडचण निर्माण झाली. पण, तरीही शक्य तितक्या वेगात हे कार्य सुरू आहे. पावसामुळे येथील नेटवर्कदेखील बाधित झाले. त्यामुळे घटनास्थळापासून संपर्क पूर्णत: तुटला. तो पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर लगेचच मंदिर पूर्णत: रिकामे करण्यात आले. लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. डॉक्टरांच्या चमूलाही ताबडतोब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. काही जखमींना लगेचच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून अतिशय लोकप्रिय अशा या ठिकाणी दुरून आलेल्या भाविकांच्या नातेवाईकांनी शिमला येथे पोलिस ठाण्यांमध्ये दूरध्वनी करून आपल्या आप्तजनांविषयी माहिती मिळविण्यासाठी सतत संपर्क कायम ठेवला आहे. बेपत्ता भाविकांविषयी चौकशी सुरू असून मृतांचा नेमका आकडा अद्याप प्रशासनाने जाहीर केलेला नाही. सध्या प्रशासनाने 50 जणांच्या मृत्यूची पुष्टी केलेली आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
नैना देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांचा आकडा अधिकृतरित्या 135 सांगितला जात असला तरी घटनेची भीषणता पाहता हा आकडा जास्त असल्याचे बोलले जात आहे. जखमींची संख्या बरीच मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

No comments: