Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 August, 2008

पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह राज्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले

पणजी, दि. ५ (प्रीतेश देसाई): चोरट्यांपासून रक्षण करू न शकणारे पोलिस दहशतवाद्यांपासून गोव्याचे रक्षण कसे करणार, असा गंभीर प्रश्न सध्या सामान्य जनतेला पडला आहे. गेल्या एका महिन्यात काणकोण, मडगाव, फोंडा, म्हापसा आणि पणजी शहरांत झालेल्या घरफोड्या आणि अन्य चोऱ्यांचे प्रमाण पाहिल्यास या प्रश्नाला चांगलीच बळकटी मिळते.
१ ते ३० जुलै ०८ पर्यंत म्हापशात ३, मडगाव ७, फोंडा ३, पणजी २ तरी काणकोण २ अशा एकूण १७ जबरी चोऱ्या झालेल्या आहेत. यातील केवळ २ चोऱ्यांचा तपास लागला आहे. एका महिन्यात झालेल्या या चोऱ्यांत सुमारे १५ लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली आहे.
जुलैच्या सुरुवातीलाच १ रोजी काणकोण येथील प्रदीप प्रभुदेसाई यांच्या घरात दिवसाढवळ्या चोरी करून सुमारे एका लाखाचे दागिने लुटण्यात आले. त्यानंतर दि. २ रोजी मडगाव येथील मोबाईल विक्रीचे दुकान फोडून सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला गेला. दि. ४ रोजी पणजी येथे जॅकलीन या अट्टल चोरट्या महिलेने दुकानात कर्मचारी म्हणून काही दिवस काम केल्यावर ८७ हजार रुपयांच्या कॅमेऱ्यावर हात मारला. दि. १४ रोजी सांगे येथील विद्यालयात १ लाख रुपयांचे संगणकाचे सुटे भाग चोरण्यात आले. दि. २३ रोजी मडगाव येथे मुश्ताक याचे दुकान फोडून १ लाख ९० हजारांचे लॅपटॉप चोरीला गेले. त्यानंतर दि. २४ रोजी तळावलीकर दुकान फोडून ३.४५ लाख रुपयांचे कॅमेरे पळवण्यात आले तर, दि. २५ जुलै रोजी संतोष कुंकळकर याचे दुकान फोडून १ लाख ४५ लाख रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला.
पुन्हा महिन्याच्या अखेरीस चोरट्यांनी काणकोण शहरालाच लक्ष्य करून दि. २९ रोजी पोलिस चौकीपासून केवळ तीनशे मीटरवर असलेल्या मधुकर कुडाळकर यांच्या घरात दिवसाढवळ्या प्रवेश करून सव्वा लाख रुपयांचे दागिने लंपास केले.
गोव्यात बिनधास्तपणे चोरी करणारी चोरांची टोळी कोठून येते, चोरी करून ती कोठे आणि कशी पळून जाते, त्यांची चोरी करण्याची कोणती पद्धत आहे, याचा कोणताही अभ्यास गोवा पोलिसांचा नसल्याचे दिसत आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मडगाव शहरात चोरी करणारी टोळी ही रेल्वेमार्गे गोव्यात येते आणि रेल्वेमार्गेच पळून जाते. काणकोण शहरात चोरी करणारी टोळी काणकोण परिसरातील जंगलातून तसेच कारवार येथून येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलिसांनी "बिट' पद्धत भक्कम केल्यास या चोरांच्या मुसक्या आवळायला पोलिसांना वेळ लागणार नाही, असा दावा पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

No comments: