Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 August, 2008

पोलिस म्हणतात, आम्ही आमचे कर्तव्य बजावणार

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपद मिळाले असले तरी आमच्या कामकाजावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी जे घडले ते योग्य की अयोग्य यावर चर्चा करणे आता वायफळ असून, परिस्थितीनुरूप ते घडले. त्यामुळे यापुढेही जी परिस्थिती असेल त्यास सामोरे जाण्याची तयारी या पोलिसांनी दाखवली आहे. "बदला' घेणे ही संकल्पना हिंदी चित्रपटात शोभणारी आहे, पण प्रत्यक्षात तसे न करण्याचे बाबूश यांनी ठरवले आहे. तसे त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही स्पष्ट केले आहे.
लोकप्रतिनिधी हा लोकांनी निवडून द्यायचा असतो. तथापि, आता ती स्थिती राहिलेली नाही. ज्याच्या मनगटात "दम' असतो तोच सर्व सूत्रे आपल्या इच्छेनुसार हलवतो. अगदी मतदानास हक्क समजून हा हक्क बजावणारेही अगदी त्या दमदार व्यक्तीच्या सोयीनुसार मतदान करून मोकळे होतात. जिथे जनताच इतकी "भिडस्त' तिथे तिच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलिस तरी वेगळे असतील का? पण खाकी वर्दी परिधान करताना त्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेचा विसर सर्वच पोलिसांना पडतो अशातलाही भाग नाही. गोवा हे राज्य छोटे असले तरी येथेही कर्तव्यभावनेने झपाटलेल्या पोलिसांची उणीव नाही. त्यामुळेच राजकीय उलथापालथ झाल्यानंतर घाबरून जाण्याचे वा कर्तव्यात कसूर करण्यासारखे कारण नाही, असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

No comments: