Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 August, 2008

दिवसभर रंगले नारायण राणेंचे राजीनामा नाटय

मुंबई, दि.६ : व्हिडिओकॉनला कवडीमोल भावाने दिलेल्या भूखंड प्रकरणाचा मुद्दा बनवून राजीनाम्याची धमकी देणाऱ्या महसूलमंत्री नारायण राणे यांच्या राजीनामा नाटयाने बुधवारचा दिवस चांगलाच गाजला. काल महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी वादावादी झाल्यावर राजीनाम्याची धमकी देणाऱ्या राणे यांनी आज प्रथम सोनिया गांधी यांची भेट घेऊन मगच राजीनामा देण्याची भूमिका घेतली.
आज सकाळपासून राणे यांच्या राजीमान्याच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांवर झळकत होत्या. त्यामुळे मंत्रालय आणि राजकीय वर्तुळातही राणेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. मात्र, राणे विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्याशी पत्रकारांचा संपर्क होऊ शकत नव्हता. ज्या मंत्रिमंडळात मला स्थान नाही, त्यापासून दूर राहाणेच मी पसंत करेल, असा आक्रमक पवित्रा राणे यांनी घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओकॉनला जमीन देण्याचा घेतलेला निर्णय आतबट्टयाचा व्यवहार असल्याने त्यात सामील होण्यापेक्षा राजीनामा देण्याची तयारी राणे यांनी दर्शवल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या बातमीला वजन प्राप्त झाले होते. परंतु, दुपारी राणे यांनीच आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. आपण उदया दिल्लीला जाऊन सोनिया गांधी आणि महाराष्ट्र प्रभारी मार्गारेट आल्वा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू मगच राजीनामा देऊ असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.
व्हिडिओकॉनला जमीन देण्याचा निर्णय कॉंग्रेसचे केंद्रीय नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पातळीवरून झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या गोटातून सांगितले जात आहे. कॉंग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री शरद पवार यांनीच मुख्यमंत्र्यांना तातडीने जमिन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर करण्याच्या सूचना दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राणे यांच्या या बंडखोरीला दिल्लीत कितपत थारा मिळेल, याबाबतही शंका घेतली जात आहे. आता साऱ्यांचे लक्ष त्यांच्या उद्याच्या दिल्ली भेटीकडे लागले आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी नारायण राणे यांनी याआधी हजारो कोटींचे भूखंड नाममात्र किंमतीत धनदांडग्यांच्या घशात घातले आहेत, असा मुद्दा उपस्थित करून व्हिडिओकॉनच्या जमिनीबद्दल राणे यांना बोलण्याचा अधिकारच नाही, असा हल्ला चढविला आहे.

No comments: