Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 August, 2008

बाबूश यांचा शपथविधी नार्वेकर यांचा अखेर राजीनामा

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांना दया न दाखवता कॉंग्रेस श्रेष्ठींनी मंत्रिपद सोडण्याचे सक्त आदेश दिल्याने आज अखेर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता राजभवनावर झालेल्या सोहळ्यात ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात याना राज्यपाल एस. एस. सिद्धू यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. त्यामुळे राज्यातील राजकीय नाट्यावर तूर्त पडदा पडला आहे.
शपथग्रहण सोहळ्यावर प्रदेश कॉंग्रेसच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातला, मात्र मंत्रिमंडळ व आघाडीचे बहुतेक नेते जातीने हजर होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हेही भाजप आमदारांबरोबर यावेळी बाबूश यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. बाबूश यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा,आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पंचायतमंत्री बाबू आजगावकर, उपसभापती माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा,सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक,आमदार आग्नेल फर्नांडिस, चंद्रकांत कवळेकर, मगोचे आमदार दीपक ढवळीकर आदी उपस्थित होते. पणजी महापालिकेचे बहुतेक सत्ताधारी नगरसेवक या सोहळ्याला हजर होते. बाबूश यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात व त्यांचे पुत्र मात्र अनुपस्थित असल्याची कुजबुज सुरू होती.
कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी. के. हरिप्रसाद हे काल दिल्लीहून तातडीने गोव्याला परतल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. काल संध्याकाळी नार्वेकर यांना राजीनामा देण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे काल शपथविधी झाला नाही. रात्री उशिरा मुख्यमंत्री कामत यांनी नार्वेकरांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची समजूत काढली व अखेर त्यांनी श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशाचे पालन करून राजीनामा देण्यास तयारी दर्शवली असे कामत यांनीच पत्रकारांना सांगितले.
वित्तमंत्री या नात्याने नार्वेकरांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही कामत यांनी काढले. दरम्यान, नार्वेकर यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्याचे कारण काय,असा सवाल केला असता त्याबाबत चकार शब्द न काढता हा श्रेष्ठींचा निर्णय असल्याचे कारण कामत यांनी पुढे केले. आपले सरकार पहिल्यांदा जेव्हा संकटात सापडले तेव्हा बाबूश यांनीच ते तारले. त्यामुळे चर्चिल यांच्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्याचा शब्द श्रेष्ठींनी दिला होता व त्याची पूर्तता करण्यात आली,असा खुलासा त्यांनी केला.
विधानसभेतील सर्वांधिक अनुभवी व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या नार्वेकरांकडून मंत्रिपद काढून ते बाबूश यांना दिले यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विश्वास ठेवणे कठीण जात आहे. नार्वेकरांच्या समर्थकांत तर तीव्र असंतोष पसरला आहे. मात्र नार्वेकरांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केल्याने ते गप्प आहेत. नार्वेकर यांनी आपल्या गुडघ्याचे ऑपरेशन केल्याने ते सध्या घरात आराम करीत आहेत. कॉंग्रेस श्रेष्ठींनी याच संधीचा फायदा घेऊन त्यांचा काटा काढल्याची टीकाही त्यांचे समर्थक करीत आहेत.

No comments: