Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 7 August, 2008

'सिमी'वरील बंदी कायम सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्ली, दि. ६ : स्टुडंस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात "सिमी' या कट्टरवादी संघटनेवरील बंदी कायम राखण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. यामुळे काल यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली असून केंद्र सरकारला काही अंशी दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारला सिमीवरील बंदी कायम ठेवण्याबाबत न्यायालयाकडे ठोस पुरावे सादर न करता आल्याने उच्च न्यायालयाने या संघटनेवरील बंदी उठविण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना देशातील दहा राज्यांनी या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या आधारे आज सर्वोच्च न्यायालयाने बंदीचा निर्णय जाहीर केला असून सिमीला तीन आठवड्यांच्या आत आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे.

No comments: