Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 5 August, 2008

सरकारची स्थिरता आघाडी घटकांवर अवलंबून : पर्रीकर

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): बाबूश यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इतर भाजप आमदारांसह विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दर वेळी अशा समारंभाचे आमंत्रण विरोधकांना देण्यात राज्यशिष्टाचारा खात्याकडून मोठ्याप्रमाणात हलगर्जीपणा केला जात होता व त्याबाबत वारंवार आपण टीकाही केल्याचे पर्रीकर म्हणाले. यावेळी मात्र कायदेशीर व व्यवस्थित आमंत्रण देण्यात आल्याने त्याचा मान राखण्यासाठीच हजर राहिल्याचे ते म्हणाले. नार्वेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्याची पहिली मागणी आपणच केली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. सरकारने ही मागणी मान्य केली खरी परंतु त्यासाठी वेगळी पद्धत वापरली हे गोष्ट अलाहिदा असे ते म्हणाले. सरकारची स्थिरता ही पूर्णपणे आघाडी घटकांवर अवलंबून आहे. गेल्या दोन वेळी सरकार अस्थिर बनवण्याचे प्रयत्न हे खुद्द सरकाराअंतर्गत गटानेच केले होते त्यात भाजपचा किंचितही सहभाग नव्हता असे स्पष्टीकरण देत ते कितपत स्थिरता ठेवतात यावर हे अवलंबून आहे,असे पर्रीकर म्हणाले. पूर्ण मंत्रिमंडळ हे आता केवळ सासष्टीपुरते मर्यादित बनले आहे. बार्देश, डिचोली, तिसवाडी, केपे, सांगे, काणकोण आदी तालुक्यांना सरकारात प्रतिनिधित्व नसल्याने हे लोक कॉंग्रेसला योग्य तो धडा शिकवतील असेही पर्रीकर म्हणाले. पर्रीकर यांच्यासोबत आमदार दामोदर नाईक, विजय पै खोत,अनंत शेट, महादेव नाईक,मिलिंद नाईक आदी हजर होते.

No comments: