Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 14 January, 2011

गृह खात्याच्या निष्क्रियतेमुळे राज्याच्या प्रतिमेला तडा - प्रा. पार्सेकर

पणजी, दि. १३ (विशेष प्रतिनिधी)
गोव्याला निसर्गसंपन्न व शांतताप्रिय राज्य म्हणून आजवर ओळखले जात होते. परंतु, अलीकडे राज्यात होत असलेल्या चोर्‍या, खून, मंदिरातील मूर्तिभंजनाचे प्रकार व बलात्कारासारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांनी राज्याच्या या प्रतिमेला तडा दिला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा साफ बोजवारा उडाला असून ज्यांच्या हाती सुरक्षेची दोरी, त्याच गृहखात्याचे पोलिस अमली पदार्थांच्या व्यवहारात बरबटले आहेत. त्यामुळे सध्याच्या सरकारच्या हाती गोवा सुरक्षित राहिलेला नाही हेच यातून सिद्ध होत असल्याची टीका मांद्रेचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे केली.
दै.‘गोवा दूत’शी बोलताना पार्सेकर यांनी, राज्याची जी प्रतिमा सत्ताधारी सरकारने उभी केली आहे ती अत्यंत धोकादायक असून भविष्यात या राज्याकडे पर्यटक फिरकतील की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत असल्याचे नमूद केले. गोवा हा एरवी शांतताप्रिय प्रदेश म्हणून गणला जात होता. मात्र अलीकडच्या काही घटना पाहता गोव्याची ही ओळख अकार्यक्षम सरकारमुळे पुसली गेल्याचे ते म्हणाले.
लोखंडाला जोपर्यंत गंज चढलेला नसतो तोपर्यंत ते मजबूत असते. पण एकदा का गंज चढला की मग मात्र त्याचे काही खरे नसते, ते कधीही मोडून पडू शकते. अशीच अवस्था विद्यमान सरकारच्या गृह खात्याची झाली असल्याचे सांगून पार्सेकर यांनी गृह खात्यावर हल्लाबोल केला. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जरी पोलिस खात्यावर असली तरी या खात्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम गृह खात्याच्या अखत्यारीत येते. तथापि, हे खातेच पुरते गंजून गेले असून त्याचा डोलारा पूर्णपणे कोसळला आहे. या खात्याचे मंत्री रवी नाईक जरी उडवाउडवीची उत्तरे देत असले तरी मंदिरातील चोर्‍या व तोडफोडीच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेच्या भावनांना फार मोठा धक्का पोचल्याची टीका पार्सेकर यांनी यावेळी केली.
राज्यातील गुन्हेगारी घटना या गोमंतकीयांच्या मनावर विपरीत परिणाम करणार्‍या ठरल्या असून दूरगामी विचार करता ही स्थिती राज्यासाठी धोकादायक आहे. सामान्यांचे जीवनच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती आज उद्भवली असून आम आदमीचे सरकार म्हणून टेंभा मिरविणार्‍यांचा आम आदमीसाठीचा नाटकी कळवळा यातून उघड होत असल्याचा टोला पार्सेकर यांनी हाणला. गोव्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप करून या राज्यात सरकार नावाची गोष्ट तरी अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
गुन्हेगारी स्वरूपाची जी प्रकरणे नोंद होतात त्याहीपेक्षा कितीतरी अधिक गुन्हे राज्यात घडत असतात. तथापि, ती नोंद केल्यास गुन्ह्यांची संख्या फुगेल व राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित असल्याचा निर्माण केलेला फुगा फुटेल म्हणूनच त्यांपैकी बर्‍याच प्रकरणांचा बाहेरच्या बाहेर निकाल लावला जातो असा आरोपही पार्सेकर यांनी केला. सामान्यांच्या या सरकारकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नसून सरकाराप्रति त्यांचा संताप आंदोलने, निदर्शने, मोर्चे याव्दारे गेल्या काही वर्षांपासून सतत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याची ही डागाळलेली प्रतिमा बदलणे ही काळाची गरज बनली आहे. अर्थात त्याला राजकीय परिवर्तन हाच पर्याय असल्याचे सांगताना ते म्हणाले की, जनतेप्रति वेगळा दृष्टिकोन बाळगणारे संवेदनशील सरकार सत्तेवर यायला हवे. विद्यमान सरकारची ‘कार्यक्षमता’ एव्हाना गोमंतकीयांना पुरती कळून चुकली असल्याने सत्तेच्या गादीवर पहुडलेल्यांनी मोठमोठी स्वप्ने पाहू नयेत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
गोव्यात कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात सध्या जे अराजक माजले आहे, त्याला सर्वस्वी गृहमंत्री रवी नाईक हेच जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. गृह खात्याचा कारभार सांभाळण्याचे काम त्यांना समर्थपणे पेलता आलेले नाही. त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांचे नातेवाईकही नको तेवढे सक्रिय झाल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

No comments: