Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 13 January, 2011

बांदेकर खाण कंपनीविरोधात शिरगावात तीव्र असंतोष

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): शिरगाव कोमुनिदादचे अध्यक्ष प्रकाश गावकर व ऍटर्नी अच्युत गावकर यांनी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक नोटिशीची गंभीर दखल ‘राजाराम बांदेकर (शिरगाव) माईन्स प्रा. लि.’ने घेतली असून या नोटिशीत कंपनीची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याने नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचा इशारा सदर कंपनीने दिला आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात शिरगावात तीव्र असंतोष उफाळून आला आहे.
शिरगाव कोमुनिदादतर्फे गेल्या ४ जानेवारी २०११ रोजी एक जाहीर नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीत ‘मेसर्स राजाराम बांदेकर (शिरगाव) माईन्स प्रा.ली.’ व ‘मेसर्स चौगुले ऍण्ड कंपनी प्रा. ली.’ या कंपन्यांना खाण खात्यातर्फे परवाना स्वरूपात देण्यात आलेली ४/४९ व ५/४९ ही जागा जुन्या कॅडेस्ट्रल सर्वे क्रमांक ९५ नुसार शिरगाव कोमुनिदादच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. हे खाण परवाने सध्याच्या सर्वे क्रमांक ६/०, ९३/१, ८२/०, ८३/०, ८४/०, ८५/० या अंतर्गत येतात. या उभय खाण कंपन्यांकडून कोमुनिदादला ‘भू हक्क’ कायद्यानुसार शुल्क अदा करण्यात आले नाहीत, असे म्हणून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहितीही कोमुनिदादच्या नोटिशीत देण्यात आली होती. या दोन्ही खाण परवान्यांतील जागांबाबत कुणीही सदर कंपन्यांकडे करार किंवा व्यवहार करू नयेत, असे बजावून तसे झाल्यास त्याला पूर्णतः तेच जबाबदार ठरतील, असा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, या नोटिशीला राजाराम बांदेकर खाण कंपनीतर्फे तीव्र हरकत घेण्यात आली आहे. या नोटिशीमार्फत शिरगाव कोमुनिदादकडून कंपनीची बदनामी केल्याचा दावा करून त्यांच्याविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. राजाराम बांदेकर खाण कंपनीच्या या पवित्र्यामुळे शिरगावातील वातावरण बरेच तापले आहे. मुळातच शिरगाव कोमुनिदादची जागा या खाण कंपनीच्या नावे लागल्याने याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे.
आता तरी डोळे उघडा
शिरगावातील खाण उद्योगाविरोधात लढा उभारलेल्या ग्रामस्थांची हेटाळणी करून खाण कंपन्यांची तळी उचलून धरणार्‍या लोकांचे या प्रकारानंतर डोळे उघडतील काय, असा सवाल सुरेश बाबनी गावकर यांनी केला आहे. शिरगाव कोमुनिदादची जागा हडप करून ती आपल्या नावे लावण्याच्या प्रकाराविरोधात यापूर्वीच महसूल खात्याकडे तक्रार करण्यात आली आहे व त्याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयातही सुरू आहे. खाण कंपनी गावात फूट पाडून आपला स्वार्थ साधत आहे, असा आरोप सातत्याने केला असता गावातीलच काही लोक त्याची खिल्ली उडवत होते. आता या घटनेनंतर या खाण कंपनीने आपले खायचे दात दाखवले आहेत; त्यामुळे निदान आता तरी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने या खाण कंपन्यांचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन आनंद कृष्णा गावकर यांनी केले आहे.
शिरगावातील कोमुनिदाद घटकांनी देणग्या घेतल्या असा आरोप खाण कंपनी करते. या देणग्या दिल्या म्हणजे शिरगाववासीयांवर उपकार केले असा समज कंपनीने करून घेऊ नये. या खाण कंपन्यांकडून शिरगावची जी वाताहत झाली आहे ती कधीही भरून काढता येणार नाही. देणग्या दिल्या म्हणजे शिरगाववासीयांना विकत घेतले असे या कंपनीला म्हणायचे आहे काय, असा खडा सवालही श्री. गावकर यांनी केला. एकीकडे शिरगाव उध्वस्त करण्यासाठी पुढे सरसावलेल्या या खाण कंपन्यांकडून असा पवित्रा घेतला जात असेल तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिरगाववासीयांनी आता एकत्रित लढा उभारून या सर्व खाण कंपन्यांना शिरगावातून हुसकावून लावण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही यावेळी श्री. गावकर म्हणाले.

No comments: