Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 21 July, 2011

कॉंग्रेसच्या राष्ट्रभिमानी कार्यकर्त्यांनी नेत्यांना जाब विचारावा

भाजयुमो अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): मातृभाषेचा घात करण्याच्या निर्णयात महत्वाची भूमिका बजावलेले कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी जगमितसिंग ब्रार यांना पाळी येथील कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात स्वाभिमानी कॉंग्रेसवाल्यांनी जाब विचारावा, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भाषा माध्यमप्रश्‍नी संधिसाधू भूमिका घेणारे राणे पिता-पुत्र व आलेमांव यांच्या वळचणीला बांधले गेलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. साखळीतील राष्ट्रप्रेमी तथा मातृभाषाप्रेमीं कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना त्यांची चूक दाखवून देण्याचे धाडस दाखवून एक आदर्श धडा घालून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सत्तरी तालुक्यासह उत्तर गोव्यातील इतर मतदारसंघात आपला दबदबा निर्माण करून गोव्यातील राजकारणाचे ‘किंगमेकर’ बनण्याचे स्वप्न पाहणारे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीच उद्या २१ रोजीचा मेळावा भरवला आहे. राज्यभरात कॉंग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर हा मेळावा आयोजित करून साखळी मतदारसंघातील जनता आपल्या मुठीत असल्याचे श्रेष्ठींना दाखवून देण्याचाच हा घाट आहे. मातृभाषा रक्षणाचा विषय हा राजकारण विरहीत आहे. कॉंग्रेस पक्षातील सर्वंच कार्यकर्ते राणेंचे गुलाम किंवा हुजरे नाहीत तर अजूनही या पक्षात स्वाभिमानी व राष्ट्रभक्त नागरिक आहेत व त्यांनी पूर्णपणे सध्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हे नागरिक नक्कीच या मेळाव्यात आपल्या नेत्यांना भाषा माध्यमप्रश्‍नी घेतलेल्या राष्ट्रद्रोही निर्णयाचा जाब विचारतील, असा विश्‍वास डॉ.सावंत यांनी बोलून दाखवला.
‘पीपीपी’चा बॅण्डबाजा!
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी एकाधिकारशाहीने म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’ करण्याचा निर्णय घेतला खरा परंतु या निर्णयाचा सध्या उच्च न्यायालयात ‘बेंडबाजा’ सुरू आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याबाबत मौन धारण करणे याचा अर्थ काय, असा सवाल डॉ. सावंत यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे मौन म्हणजे त्यांनाही हा निर्णय मान्य नसल्याचीच प्रचिती आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. नवीन इस्पितळे जरूर बांधा पण सध्या सुरू असलेल्या इस्पितळांत रुग्णांना चांगली सेवा मिळावी याकडे आरोग्यमंत्र्यांचे अजिबात लक्ष नाही. पाळीतील खाण उद्योगामुळे व बेदरकार खनिज वाहतुकीमुळे स्थानिकांना करावी लागणारी कसरत याबाबत खाणमंत्री म्हणून मुख्यमंत्री कामत यांनी काय केले. इथली शेती खनिज प्रदूषणामुळे उध्वस्थ झाली व ती पूर्ववत करण्यासाठी कृषिमंत्री म्हणून विश्‍वजित राणे यांनी काय केले, असा सवालही डॉ. सावंत यांनी केला.
महिलांचा फक्त मतांसाठी वापर
महिलांना स्वावलंबी बनवण्याचे सोडून फक्त त्यांचा राजकीय मतांसाठी वापर करण्याचे काम कॉंग्रेसकडून सुरू आहे. पाळीतील मेळाव्याला अशाच पद्धतीने महिलांची गर्दी खेचली जाईल व त्यांच्यावर विविध घोषणांची खैरात केली जाईल.कॉंग्रेस पक्षातील एकमेव महिला आमदार असलेल्या व्हीक्टोरीया फर्नांडिस यांची काय परिस्थिती करून ठेवली आहे यावरूनच महिलांची या पक्षाला किती कदर आहे हे लक्षात यावे,असा चिमटाही डॉ.सावंत यांनी काढला. कॉंग्रेसच्या खोट्या घोषणांना व भूलथापांना जनतेने अजिबात बळी पडू नये असे आवाहन करतानाच कॉंग्रेसने देशाची व गोव्याची काय अवस्था करून ठेवली आहे त्याची स्मृती ठेवून या नेत्यांना अद्दल घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहनही डॉ.प्रमोद सावंत यांनी केले.

No comments: