Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 17 July, 2011

प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून

जुवारीनगर हादरले - तीन तासांत दोघे जेरबंद
वास्को, दि. १६(प्रतिनिधी): प्रियकराशी संगनमत करून आपल्या पतीचा डोक्यात बत्ता घालून निर्घृण खून करणार्‍या पत्नीच्या पाशवी कृत्यामुळे आज जुवारीनगर हादरले. उपासनगर येथील श्रद्धा हाउसिंग कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये काल रात्री ही अघोरी घटना घडली. परदेशातून एका महिन्यासाठी सुट्टीवर आलेल्या आनंद कुमार पाल (४१) याचा त्याची पत्नी लालसा पाल हिने आपला पूर्वाश्रमीचा प्रियकर कौशल कुमार (२७) याच्या मदतीने कट रचून काटा काढला. दरम्यान, आईच्या या कृष्णकृत्यामुळे त्यांच्या दोन लहान मुलांवर अनाथ होण्याची पाळी ओढवली आहे.
वास्तविक, चोरीच्या उद्देशाने हा खून झाला असे पोलिसांना भासवण्याचीही लालसा व कौशल यांनी योजना आखली होती. मात्र, वेर्णा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी लालसा हिची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी तिला व रात्री खून करून सकाळी कामावर गेलेल्या कौशल कुमार याला तीन तासांत ताब्यात घेतले. ती दोघे उत्तरप्रदेश येथील आहेत.
सविस्तर माहितीनुसार, उपासनगर येथील श्रद्धा हाउसिंग कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने घुसून तेथे राहणारा आनंद कुमार पाल याचा खून केला; तसेच त्याच्या पत्नीला दोरीने बांधून सोन्याचे ऐवज व वीस हजाराची रोकड लंपास केल्याचे वृत्त
सकाळीच या भागात पसरल्याने भीतीचे वातावरण पसरले. दाबोळी येथे दोनच आठवड्यापूर्वी चोरांनी घरात घुसून वृद्धेचा खून केल्याची घटना ताजी असल्याने लोकांत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी येऊन खुनाच्या तपासकामास प्रारंभ केला असता त्यांना संशयास्पद गोष्टी आढळल्या. त्यावरून लालसा हिची कठोर तपासणी केली असता, आपण आपल्या प्रियकराच्या संगनमताने पतीचा काटा काढल्याचे तिने मान्य केले.
सकाळी ५च्या सुमारास पाल जोडप्याच्या प्रतीक या ९ वर्षीय मुलाने शेजारी राहणार्‍या विजयन आलोकन यांचा दरवाजा ठोठावला. प्रतीक त्यांना आपल्या घरी घेऊन गेला असता विजयन यांना लालसा हातपाय व तोंड बांधलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली आढळली. तिची मुक्तता करून ते बेडरूममध्ये गेले असता त्यांना आनंद मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी त्वरित वेर्णा पोलिसांना कळवले.
लालसा हिचा कांगावा
पोलिसांनी चौकशीस प्रारंभ केला असता, लालसा हिने, रात्री अज्ञातांनी आपल्या घरात शिरून आपल्याला बांधून आपल्या पतीवर हल्ला केल्याची माहिती त्यांना दिली. घरातील सोन्याचे ऐवज व वीस हजाराची रोख रक्कमही चोरांनी लंपास केल्याचे तिने सांगितले. मात्र, पोलिसांना तिच्यावर संशय आल्याने त्यांनी तिला उलटसुलट प्रश्‍न विचारून कोंडीत पकडले. शेवटी आपणच आपल्या प्रियकराच्या साह्याने हे अधम कृत्य केल्याची तिने कबुली दिली.
खून असा केला
लालसा हिने दिलेल्या कबुलीनुसार, काल शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता पती आनंद, मुलगा प्रतीक (९) व मुलगी दीप्ती (४) झोपल्यानंतर लालसा हिने मोबाईलवर संपर्क साधून कौशलला बोलावून घेतले. त्यानंतर गाढ झापेत असलेल्या आनंदच्या डोक्यावर बत्त्याने वार करत त्याचा खून केला. यावेळी तिची मुलगी दीप्ती त्याच्या शेजारीच झोपली होती. त्यानंतर हा खून चोरीसाठी करण्यात आल्याचे भासवण्यासाठी तिला कौशलने बांधून टाकले व तो निघून गेला. कौशलशी तिचे लग्नापूर्वीपासून संबंध होते.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालसा हिने काही काळापूर्वी कौशल याला उत्तरप्रदेशातून गोव्यात बोलावून घेतले होते. एका महिन्यापूर्वी त्यांनी खुनाचा हा कट रचला. कौशल वास्कोतील एका कंत्राटदारामार्फत गोवा शिपयार्डात सुपरवायझर म्हणून काम करत होता. पोलिसांनी तेथूनच त्याला ताब्यात घेतले. त्यानेही खुनाची कबुली दिली असून खून करण्यासाठी वापरलेला बत्ता फ्लॅटमध्येच असल्याचे सांगितले.
पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोक्यात घाव घालण्यापूर्वी आनंदचा गळाही आवळण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यांच्या माहितीनुसार, आनंद एका जहाजावर नोकरीला होता व १५ दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. पाल यांचे नातेवाईक आज उशिरा रात्री गोव्यात आल्यानंतर दोन्ही मुलांना त्यांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहितीही देण्यात आली. वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी लालसा व तिचा प्रियकर कौशल यांच्याविरुद्ध भा. दं. सं. ३०२ आर/डब्ल्यू ३४ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. आनंद याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवण्यात आला आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या खूनप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
-----------------------------------------------------------
चिमुकल्यांचे काय?
आईच्या अधम कृत्यामुळे ९ वर्षाचा प्रतीक व ४ वर्षाची दीप्ती यांच्यावर आभाळ कोसळले आहे. संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिस व शेजार्‍यांनी काहीही कळू दिले नव्हते. मात्र ही घटना समजल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होईल, या प्रश्‍नाने अनेकांना घोर लागला आहे. ही चिमुरडी केंद्रीय विद्यालयात शिकत होती. आता पाल यांचे नातेवाईक त्यांना उत्तरप्रदेश येथे घेऊन जाणार असल्याचे कळते. पोरक्या झालेल्या या मुलांना पाहून आज अनेकांचे डोळे पाणावले.

No comments: